Tokyo Olympic, PV Sindhu : भारताची 'बॅडमिंटनक्वीन' पी.व्ही सिंधूनं जिंकलं कांस्य पदक, चीनी खेळाडूला नमवलं; रचला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 18:02 IST2021-08-01T18:01:00+5:302021-08-01T18:02:39+5:30
PV Sindhu Vs He Bingjiao Live Score, Tokyo 2020:

Tokyo Olympic, PV Sindhu : भारताची 'बॅडमिंटनक्वीन' पी.व्ही सिंधूनं जिंकलं कांस्य पदक, चीनी खेळाडूला नमवलं; रचला इतिहास
PV Sindhu Vs He Bingjiao Live Score, Tokyo 2020: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूनं कांस्य पदकाची कमाई केली आहे. सिंधूनं चीनच्या बिंग जिओ विरुद्धच्या सामन्यात २१-१३, २१-१५ असा खणखणीत विजय प्राप्त करत पदकावर नाव कोरलं आहे. महत्वाची बाब म्हणजे सलग दोनवेळा भारतासाठी ऑलिम्पिक पदकाची कमाई करणारी सिंधू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याआधी सिंधूनं रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती.
पी.व्ही.सिंधूनं सामन्यात सुरुवातीपासूनच मजबूत पकड निर्माण केली होती. पहिल्या सेटची सुरुवात दमदार करत सिंधूनं ४-० असा दबाव चीनच्या बिंग जिओवर निर्माण केला होता. पण त्यानंतर चीनच्या बॅडमिंटनपटूनंही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि कमबॅक करत ५-५ अशी बरोबरी साधली होती. सिंधूनं त्यानंतर आपल्या भात्यातील सुरेख फटक्यांचा नजराणा पेश करत चीनच्या बिंग जिओवर पकड निर्माण केली. पी.व्ही.सिंधूनं पहिला सेट २१-१३ असा दिमाखात जिंकला.
दुसऱ्या सेटमध्येही सिंधूनं आपला दबदबा कायम राखत दमदार सुरूवात केली. दुसरा सेट १०-७ असा आघाडीवर सिंधू होती. त्यानंतर चीनी खेळाडूनं चिवट खेळाचं दर्शन घडवत जबरदस्त कमबॅकही केलं. दुसरा सेट ११-११ असा रोमांचक स्थितीत पोहोचला. त्यानंतर सिंधूनं वाऱ्याच्या वेगानं शटल फटक्यांचं दर्शन घडवत चीनी खेळाडूला अवाक् करुन सोडलं. चीनी खेळाडूच्या फूटवर्कवर बारकाईनं लक्ष देत सिंधूनं तिची कमकुवत बाजू हेरली आणि पुढील चार पॉइंट आपल्या खात्यात जमाले. सिंधूनं १५-११ अशी आघाडी घेतली. पुढे सिंधूनं आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत दुसरा सेट २१-१५ नं जिंकून कांस्य पदकावर नाव कोरलं आहे.