येत्या 17 फेब्रुवारीला रंगणार "मुंबई श्री"चा थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 18:10 IST2019-02-04T18:09:51+5:302019-02-04T18:10:16+5:30
मुंबई शरीरसौष्ठवाला शक्तीशाली करण्यासाठी आरोग्य प्रतिष्ठानचा पुढाकार

येत्या 17 फेब्रुवारीला रंगणार "मुंबई श्री"चा थरार
मुंबई : मुंबईशरीरसौष्ठवाची खरी ओळख आणि मुंबईतील शरीरसौष्ठवपटूंच्या हृदयात सर्वोच्च स्थानी विराजमान असलेल्या प्रतिष्ठेच्या मुंबई श्रीचा थरार यंदा भव्यदिव्यच नव्हे तर अनोखा ठरणार आहे. येत्या 16 आणि 17 फेब्रूवारीला परळ रेल्वे वर्कशॉपच्या मैदानात रंगणाऱ्या या थरारात सुमारे आठ लाखांच्या रोख पुरस्कारांचा वर्षाव शरीरसौष्ठवपटूंवर केला जाईल, अशी माहिती स्पर्धा आयोजक प्रभाकर कदम यांनी दिली.
शरीरसौष्ठव खेळातच इतकं ग्लॅमर आहे की प्रामाणिक प्रयत्न केले तर या खेळावर पुरस्कारांचा वर्षाव करणाऱ्या दर्दी क्रीडादात्यांची गर्दी जमा होते, हे प्रत्यक्षात साकारण्याची किमया आरोग्य प्रतिष्ठानने आपल्या पहिल्याच प्रयत्नात करून दाखवली आहे. मुंबई श्री ही मुंबईकरांसाठी केवळ एक स्पर्धा नसून एक सोहळा आहे, एक उत्सव आहे. प्रत्यक्षात हाच सोहळा आरोग्य प्रतिष्ठान साजरा करणार असून यासाठी त्यांनी मुंबईच्या फिटनेस कुटुंबाला एक नवे व्यासपीठ मिळवून दिले आहे. आजवर केवळ मुंबई श्रीचा थरार मुंबईकरांना एकच दिवस पाहता येत होता. यंदा तो उत्सवासारखा दोन दिवस साजरा केला जाणार आहे.
खेळावरील आपल्या प्रेमापोटी किरण कुडाळकर, गजानन टक्के, जयदीप पवार, राजेश निकम, विशाल परब आणि प्रभाकर कदमसारख्या मेहनती संघटकांनी आरोग्य प्रतिष्ठानची स्थापना केली आणि राजेंद्र गुप्ता, विजय चिंदरकर, शैलेश कदम, प्रशांत खामकर आणि छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेता अनिल राऊत यांच्यासारख्या सक्रिय कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे चार महिन्यांच्या अथक मेहनतीनंतर त्यांनी मुंबई श्री आयोजनाचे दिव्य यशस्वीपणे पेलले आहे. या स्पर्धेसाठी मुंबईचे पीळदार आणि दमदार शरीरसौष्ठवपटूही गेले तीन महिने जिममध्ये घाम गाळत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. या स्पर्धेतूनच आगामी महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी मुंबईच्या दोन संघांची निवड केली जाणार आहे. या स्पर्धेतील पारितोषिकांचा आकडा पाहता खेळाडूंचा विक्रमी सहभाग मुंबई श्रीचे व्यासपीठ गाजवणार असा दृढ विश्वास बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी बोलून दाखविला. प्रथमच ज्या मंचावर मुंबई श्रीचा जेता निवडला जाणार आहे, त्याच मंचावर स्पर्धेची प्राथमिक फेरीही रंगणार आहे, हे विशेष.
महिला शरीरसौष्ठवपटूंसाठी मिस मुंबई
शरीरसौष्ठव खेळात आता राष्ट्रीय पातळीवर महिलांचे प्रमाण हळू वाढू लागले आहे. मुंबईतही या खेळाकडे करिअर म्हणून पाहणाऱ्या महिलांची संख्या झपाट्याने वाढतेय. अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मिस मुंबई ही महिलांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकाराचाही समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर मॉडेल फिजीक असलेल्या खेळाडूंसाठीही एक गट ठेवण्यात आला आहे. या गटातही खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या दोन्ही गटातील अव्वल पाच खेळाडूंना दणदणीत रोख पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे.