"सुवर्णपदक दिसत असताना विनेशसोबत जे झाले त्याची सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे" सुप्रिया सुळे यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 18:15 IST2024-08-07T18:14:05+5:302024-08-07T18:15:07+5:30
Vinesh Phogat Disqualified From Olympics: खासदार सुप्रिया सुळे यांनीही विनेश फोगाट हिला बाद ठरवण्याच्या घटनेविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुवर्णपदक समोर दिसत असताना विनेशसोबत जे झाले त्याची सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

"सुवर्णपदक दिसत असताना विनेशसोबत जे झाले त्याची सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे" सुप्रिया सुळे यांची मागणी
भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला महिलांच्या ५० किलो वजनी गटातील कुस्तीच्या अंतिम लढतीपूर्वी ऑलिम्पिकमधून बाद ठरवण्यात आल्याने देशवासियांना मोठा धक्का बसला आहे. दमदार कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारत ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या कुस्तीत अंतिम फेरीपर्यंत जाणारी विनेश ही पहिली भारतीय महिला ठरली होती. मात्र आज रात्री होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी विनेश फोगाट हिचं वजन तिच्या वजनी गटाच्या निर्धारित वजनापेक्षा अधिक आढळल्याने तिला स्पर्धेतून बाद ठरवण्यात आलं. दरम्यान, ऑलिम्पिकमधील या निर्णयाविरोधात देशामधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुवर्णपदक समोर दिसत असताना विनेशसोबत जे झाले त्याची सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात की, विनेश, तू मैदानाच्या आत आणि बाहेर खेळलेली प्रत्येक लढत प्रेरणादायी आहे. पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत तुला महत्वाची लढाई तांत्रिक कारणामुळे खेळता येत नाही याचे आम्हा देशवासियांना दुःख आहे. समोर सुवर्णपदक दिसत असताना तुझ्यासोबत जे झाले त्याची सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. आता या क्षणी तुझी काय मानसिकता असेल हे आम्ही समजू शकतो. तू लढवय्यी आहेस, या निराशेच्या गर्तेतून बाहेर येशील हा विश्वास आहे. विनेश, फायनल कुणीही खेळू दे पण आमच्यासाठी तूच विजेती आहेस. शुभेच्छा, असे सुप्रिया सुळे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या ५० किलो वजनी गटामध्ये भारताच्या विनेश फोगाट हिने मंगळवारी दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत मुसंडी मारली होती. सलामीच्या सामन्यात विनेश फोगाटने ऐतिहासिक कामगिरी करतावना जपानची दिग्गज खेळाडू सुसाकी विरूद्ध विजय मिळवला होता. त्यानंतर विनेशने उपांत्यपूर्व सामन्यात सामन्यात युक्रेनची प्रतिस्पर्धी ओक्साना लिवाच हिचा पराभव केला. तर उपांत्य सामन्यात विनेशने क्यूबाची कुस्तीपटू युसनेइलिस गुजमैनला ५-० नं दारुण पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली होती. अंतिम सामन्यात विनेशची गाठ अमेरिकन महिला कुस्तीपटू एस. हिल्डब्रांट्स हिच्याविरुद्द होणार होता. मात्र तत्पूर्वीच तिला अपात्र ठरवण्यात आलं.