जिद्दीची कहाणी इथेच संपत नाही; हातही हलवता येत नव्हता, तरी विश्वविक्रम! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 06:43 AM2022-07-04T06:43:46+5:302022-07-04T06:44:11+5:30

डॅनिएल बारा वर्षांचा असताना एका अपघातात त्याचा डावा हात मोडला होता. त्यानंतर त्याला ‘कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम’ (सीआरपीएस) या आजारानं घेरलं.

The story of stubbornness daniel scali who couldn't even move hand, achieve a world record! | जिद्दीची कहाणी इथेच संपत नाही; हातही हलवता येत नव्हता, तरी विश्वविक्रम! 

जिद्दीची कहाणी इथेच संपत नाही; हातही हलवता येत नव्हता, तरी विश्वविक्रम! 

Next

तुम्हाला एखादा आजार झाला तर तुम्ही काय करता? - डॉक्टरकडे जाता. चांगले उपचार घेता. जोपर्यंत पूर्णपणे बरं वाटत नाही तोपर्यंत स्वत:ची काळजी घेता. खाण्यापिण्याचं पथ्य पाळता. अर्थात सगळेच जण असंच करतात असं नाही. काही जण हा आजार जोपर्यंत गंभीर स्वरूप धारण करत नाही, तोपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करतात. फारसं गांभीर्यानं घेत नाहीत. फारच अंगावर आलं की मग मात्र ते हादरतात. हा आजार जर मुळातच गंभीर असेल, तर काही जण एकदम गर्भगळीत होतात, सारं काही दैवाच्या हवाली सोडून देतात आणि एकदम खचून जातात. काही जण मात्र हिमतीनं उभे राहतात आणि त्या आजाराला पळवून लावतात.

ऑस्ट्रेलियन ॲथलिट डॅनिएल स्कॅली हे त्याचं मूर्तिमंत प्रतीक. गंभीर आजार असतानाही त्यानं एक सोडून दोन-दोन विश्वविक्रमांना गवसणी घातली. एखाद्या माणसानं एका तासात किती पुशअप्स काढावेत?. पाच-पन्नास पुशअप्स काढतानाही जिथे अनेकांची दमछाक होते, तिथे डॅनिएलनं एका तासात तब्बल ३१८२ पुशअप्स काढले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्याची नोंद झाली, पण त्याचा हा विक्रम अल्पायुषी ठरला. काही दिवसांपूर्वीच नागपूरच्या कार्तिक जयस्वालनं डॅनिएलचा हा विक्रम मोडताना ३३३१ पुशअप्स काढले.  
डॅनिएलच्या जिद्दीची कहाणी इथेच संपत नाही. दुसरा एक विश्वविक्रम अजूनही त्याच्या नावावर आहे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी, विशेषत: सिक्स पॅक ॲबसाठी जो व्यायाम अतिशय महत्त्वाचा मानला जातो, त्या ‘ॲबडॉमिनल प्लँक’मध्येही डॅनिएलनं जागतिक विक्रम केलाय आणि त्यासाठीही त्याचं नाव गिनीज बुकमध्ये नोंदलं गेलंय. हा विक्रमही त्यानं गेल्यावर्षीच म्हणजे ऑगस्ट २०२१मध्ये केलाय. केवळ एक-दोन मिनिट ‘प्लँक’ करतानाही भल्याभल्यांची भंबेरी उडते आणि ‘थरथर’ होते, तिथे डॅनिएलनं तब्बल नऊ तास तीस मिनिटे आणि एक सेकंद इतका वेळ प्लँक करून इतिहास रचला. जॉर्ज हूडचा विक्रम त्यानं तब्बल एक तासानं मोडला.

डॅनिएल बारा वर्षांचा असताना एका अपघातात त्याचा डावा हात मोडला होता. त्यानंतर त्याला ‘कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम’ (सीआरपीएस) या आजारानं घेरलं. म्हणायला त्याच्या डाव्या हाताचं हाड फक्त मोडलं होतं, ऑपरेशननंतर ते जोडलंही गेलं; पण त्यानंतर त्याला ‘सीआरपीएस’च्या दुखण्यानं घेरलं आणि त्याचं आयुष्यच एकदम बदलून गेलं. डॅनिएलला इतका भयानक त्रास होऊ लागला की, त्याला आपला हातही हलवता येईना. हात थोडासा हलला, हलवला, त्या हाताला साधा वारा लागला, पाणी लागलं, पाण्याचे शिंतोडे उडाले तरी त्याला असह्य वेदना व्हायच्या. या वेदनांनी तो अक्षरश: किंचाळायचा, विव्हळायचा. या वेदना सहन करण्याच्या पलीकडे होत्या. त्यामुळे त्याला घराबाहेर पडणं तर मुश्कील झालंच, पण अनेकदा अनेक महिने त्याला हॉस्पिटलमध्येही दाखल करावं लागलं. तिथे त्याचा हात औषधांनी बधिर केला जायचा. त्यानंतरच त्याला जरा बरं वाटायचं; पण डॅनिएल अतिशय जिद्दी होता. इतक्या फुसक्या कारणांनी जर आपल्याला वेदना होत असतील, आपलं जगणं अशक्य होत असेल, तर कसं चालेल, म्हणून त्यानं या दुखण्यावर मात करण्यासाठी व्यायाम करायला सुरुवात केली. 

डॅनिएलच्या वेदना कायमच होत्या; पण व्यायाम करताना या वेदनांची तीव्रता कमी व्हायची. त्यामुळे त्यानं व्यायाम सुरूच ठेवला. या महाभयानक दुखण्यावर आणि दुर्धर आजारावर मात करत त्यानं जागतिक विक्रमाला गवसणी घातली, यामुळेच या विक्रमाचं महत्त्व जास्त आहे. खुद्द ‘गिनीज बुक’च्या अधिकाऱ्यांनीच यासंदर्भातला व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर शेअर केला असून त्यात डॅनिएल सांगतो, वयाच्या बाराव्या वर्षी एका छोट्याशा अपघाताचं निमित्त झालं; पण त्यानंतर जणू मी आयुष्यातून उठलो. ‘सीआरपीएस’मुळे मला इतक्या प्रचंड वेदना व्हायच्या, की प्रत्येक क्षणी मला वाटायचं, माझ्या आयुष्यातला हा शेवटचा क्षण आहे; पण त्यावर मी जिद्दीनं मात केली आणि वर्ल्ड रेकॉर्डही केलं. माझ्या दुखण्यांचं काही वाटून घेण्याचं मी बंद केलं आणि अनेक मार्ग माझ्यासाठी खुले होत गेले. 

नागपूरच्या कार्तिकनं केला नवा विक्रम
डॅनिएलला वाटत होतं, पुशअप्स आणि प्लँकचे जे दोन विश्वविक्रम आपण केलेत, ते कोणीही सहजासहजी मोडू शकणार नाहीत, पण विक्रम मोडीत काढण्यासाठीच असतात, याचा प्रत्यय त्यालाही लवकरच आला. नागपूरच्या  २१ वर्षीय कार्तिक जयस्वालनं डॅनिएलच्या पुशअप्सच्या विक्रमाला काही दिवसांपूर्वीच मोडीत काढलं. डॅनिएलनं एका तासात ३१८२ पुशअप्स काढले होते, तर कार्तिकनं ३३३१ पुशअप्स काढले. कार्तिकच्या या विश्वविक्रमानं डॅनिएललाही आश्चर्याचा धक्का बसला. या विक्रमासाठी कार्तिक गेली पाच वर्षे रोज सहा तास पुशअप्सचा सराव करीत होता. 

Web Title: The story of stubbornness daniel scali who couldn't even move hand, achieve a world record!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.