टीम इंडियाचे ‘मिशन फायनल’, बलाढ्य आॅस्ट्रेलियाविरुद्ध आज उपांत्य सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 04:47 AM2017-07-20T04:47:49+5:302017-07-20T04:47:49+5:30

आत्मविश्वास उंचावलेला भारतीय महिला संघ आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गुरुवारी बलाढ्य आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल.

Team India's 'mission-finals', today's semi-final against strong Australia | टीम इंडियाचे ‘मिशन फायनल’, बलाढ्य आॅस्ट्रेलियाविरुद्ध आज उपांत्य सामना

टीम इंडियाचे ‘मिशन फायनल’, बलाढ्य आॅस्ट्रेलियाविरुद्ध आज उपांत्य सामना

Next

डर्बी : आत्मविश्वास उंचावलेला भारतीय महिला संघ आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गुरुवारी बलाढ्य आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल. सहा वेळेच्या विजेत्या संघाला नमवून अंतिम फेरीत धडक देण्याचे कडवे आव्हान भारतापुढे असेल.
भारताचा आॅस्ट्रेलियाविरुद्ध रेकॉर्ड चांगला नाही. ४२ पैकी ३४ सामन्यांत भारतीय संघ पराभूत झाला. मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारताचा संघ मागील पराभवाचा वचपा काढण्याच्या निर्धाराने खेळेल. भारत विजयी झाल्यास स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदा अंतिम
फेरीत धडक देईल. २००५मध्ये
द. आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिल्यानंतर भारताचा आॅस्ट्रेलियाकडूनच पराभव झाला होता.
भारताने कौंटी मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासह चार सामने खेळले आहेत. आॅस्ट्रेलियाने येथे एकही सामना खेळलेला नाही. मिताली म्हणाली, ‘‘येथे चार सामने खेळण्याचा अनुभव असल्याने आॅस्ट्रेलियाला पराभूत करण्याच्या निर्धारानेच खेळणार आहोत. हे काम सोपे नाही. प्रतिस्पर्धी संघाला नमविण्यासाठी प्रत्येक विभागात सरस कामगिरी करण्याचे आव्हान असेल.’’ राऊंड रॉबिन सामन्यात आॅस्ट्रेलियाविरुद्ध मितालीने कूर्मगती फलंदाजी केली होती. ही चूक तिला सुधारावी लागेल. पूनम राऊतलादेखील शतकी खेळीची पुनरावृत्ती करावी लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध दडपण होते; पण मितालीने शतक ठोकले, तर वेदा कृष्णमूर्तीने ४० चेंडूंत ७० धावा फटकावल्या. नंतर गोलंदाजांनी न्यूझीलंडला केवळ ७९ धावांत गुंडाळले.
न्यूझीलंडविरुद्धच्या मोठ्या विजयामुळे भारतीय संघ उत्साहात आहे. आमची फलंदाजी आणि गोलंदाजी चांगलीच असून आॅस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात धडाका गाजविण्याचे प्रयत्न राहतील, असे मितालीने सांगितले.(वृत्तसंस्था)

आॅस्ट्रेलिया अपराजित नाही : एडल्जी
विश्वचषक महिला क्रिकेटमध्ये आॅस्ट्रेलिया अपराजित नाही. उपांत्य सामन्यात त्यांच्यावर विजय नोंदविण्यासाठी भारताला सर्वोत्कृष्ट कामगिरी मात्र करावी लागेल, असे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडल्जी यांचे मत आहे.
सीओए सदस्य असलेल्या एडल्जी म्हणाल्या, ‘महिला क्रिकेटमध्ये आॅस्ट्रेलिया सर्वाधिक यशस्वी संघ आहे; पण त्यांना हरवू शकत नाही, असे मुळीच नाही. डावपेच आखून खेळल्यास भारतीय संघ विजय मिळवू शकतो. भारताने नाणेफेक जिंकताच फलंदाजी घेत मोठी धावसंख्या उभारावी लागेल. मितालीसोबतच स्मृती मानधना हिलादेखील मोठी खेळी करण्याची गरज राहील.’

उभय संघ यांतून निवडणार
भारत : मिताली राज (कर्णधार), एकता बिश्त, राजेश्वरी गायकवाड, झूलन गोस्वामी, मानसी जोशी, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णामूर्ती, स्मृती मानधना, मोना मेश्राम, शिखा पांडे, पूनम यादव, नुजहत परवीन, पूनम राऊत, दीप्ती शर्मा व सुषमा वर्मा.

आॅस्ट्रेलिया : मेग लेनिग (कर्णधार), सारा अ‍ॅले, ख्रिस्टीन बीम्स, अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल, निकोल बोल्टन, अ‍ॅश्ले गार्डनर, रशेल हेन्स, एलिसा हिली, जेस जोनासेन, बेथ मूनी, अ‍ॅलिस पेरी, मेगान शट, बेलिडा वेकारेवा, अ‍ॅलिस विलानी व अमांडा जेड वेलिंग्टन.

स्थळ : कांैटी स्टेडियम, डर्बी
सामना : दुपारी ३ पासून

Web Title: Team India's 'mission-finals', today's semi-final against strong Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.