Graham Reid Team India Hockey Coach: दुष्काळ संपवला तरी...! वर्ल्डकपमध्ये लाजिरवाणा पराभव, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकांसह तिघांचे राजीनामे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 17:19 IST2023-01-30T17:08:09+5:302023-01-30T17:19:17+5:30
या तिघांनीही राजीनामा दिलेला असला तरी ते पुढील तीन महिने नोटीस पिरिएडवर असतील.

Graham Reid Team India Hockey Coach: दुष्काळ संपवला तरी...! वर्ल्डकपमध्ये लाजिरवाणा पराभव, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकांसह तिघांचे राजीनामे
एकीकडे क्रिकेटमध्ये अंडर १९ महिलांनी वर्ल्डकप जिंकून आणलेला असताना दुसरीकडे हॉकी वर्ल्डकपमध्य़े टीम इंडियाचे बेकार प्रदर्शन झाले. ओडिशात झालेल्या या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ क्वार्टरफाइनलमध्ये देखील पोहोचू शकला नव्हता. या खराब कामगिरीनंतर टीम इंडियाचे हेड कोच ग्राहम रीड यांनी राजीनामा दिला आहे.
रीड व्यतिरिक्त विश्लेषण प्रशिक्षक ग्रेग क्लार्क आणि वैज्ञानिक सल्लागार मिचेल डेव्हिड पेम्बर्टन यांनीही राजीनामा दिला आहे. हॉकी इंडियाने या तिघांचे राजीनामे स्वीकारले आहेत. 58 वर्षीय रीड यांनी भुवनेश्वरमध्ये विश्वचषक संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.
माझ्या पदावरून पायउतार होण्याची आणि पुढच्या व्यवस्थापनाकडे लगाम सोपवण्याची वेळ आली आहे. भारतीय संघ आणि हॉकी इंडियासोबत काम करणे हा एक सन्मान होता. प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला आहे. मी संघाला शुभेच्छा देतो, असे रीड म्हणाले.
या तिघांनीही राजीनामा दिलेला असला तरी ते पुढील तीन महिने नोटीस पिरिएडवर असतील. ऑस्ट्रेलियन प्लेयर राहिलेल्या रीड यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकले होते. तसेच बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य आणि FIH प्रो लीग 2021-22 हंगामात तिसरे स्थान मिळवले आहे. तर २०१९ मध्ये FIH वर्ल्ड सिरीज फायनल देखील जिंकली होती.