सूर गवसला
By Admin | Updated: February 11, 2015 01:42 IST2015-02-11T01:42:46+5:302015-02-11T01:42:46+5:30
रोहित शर्माच्या (१५० धावा, १२२ चेंडू, १२ चौकार, ७ षटकार) शतकी खेळीच्या जोरावर गतचॅम्पियन भारताने विश्वकप स्पर्धेपूर्वी सूर

सूर गवसला
अॅडिलेड : रोहित शर्माच्या (१५० धावा, १२२ चेंडू, १२ चौकार, ७ षटकार) शतकी खेळीच्या जोरावर गतचॅम्पियन भारताने विश्वकप स्पर्धेपूर्वी सूर गवसल्याचे संकेत देताना मंगळवारी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात कमकुवत अफगाणिस्तानवर १५३ धावांनी विजय मिळविला.
भारताने ३६४ धावांची दमदार मजल मारली आणि प्रतिस्पर्धी अफगाणिस्तानचा डाव ८ बाद २११ धावांत रोखला. विश्वकप स्पर्धेत १५ फेब्रुवारीला परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी टीम इंडियाला विजयाच्या ‘टॉनिक’ची गरज होती. अफगाणिस्तानसारख्या तुलनेने कमकुवत असलेल्या संघाविरुद्ध भारताने दमदार विजय मिळवीत आॅस्ट्रेलिया दौऱ्यात विजयाचे खाते उघडले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारताना भारताने ५० षटकांत ५ बाद ३६४ धावांची दमदार मजल मारली आणि प्रतिस्पर्धी अफगाणिस्तानचा डाव ८ बाद २११ धावांत रोखला. भारतीय गोलंदाजांनी आॅस्ट्रेलियात प्रथमच अचूक मारा केला.
रोहितच्या आक्रमक शतकी खेळीव्यतिरिक्त डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने ७५ धावांची आक्रमक खेळी केली. अजिंक्य रहाणेने नाबाद ८८ धावा फटकावीत भारताला दमदार मजल मारून दिली. भारतीय फलंदाजांनी या लढतीत चांगला सराव केला. पण, स्टार फलंदाज विराट कोहली केवळ ५ धावा काढून बाद झाला. कोहलीचे अपयश टीम इंडियासाठी अद्याप चिंतेचा विषय आहे.
भारतीय गोलंदाजांनी मोठ्या धावसंख्येचा लाभ घेताना अचूक मारा केला व अफगाणिस्तानचा डाव माफक धावसंख्येत रोखला. वेगवान गोलंदाज मोहित शर्मा व डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा यांनी अनुक्रमे ४० व ३८ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी २ बळी घेतले. उमेश यादव, रवीचंद्रन आश्विन व रैना यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.