राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो : मुंबई उपनगर, बिड, रायगडची विजयी घोडदौड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 06:33 PM2019-12-13T18:33:29+5:302019-12-13T18:34:01+5:30

पुरुषांच्या ब गटातील अतिशय अतीतटीच्या झालेल्या सामन्यात रायगडने धुळ्यावर 18-17 असा एक गुणाने विजय मिळवला.

State Championship and Selection Trials Kho-Kho: Mumbai Suburbs, Bid, Raigad won first match | राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो : मुंबई उपनगर, बिड, रायगडची विजयी घोडदौड

राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो : मुंबई उपनगर, बिड, रायगडची विजयी घोडदौड

Next

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने सोलापूर अम्युचर खो खो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली उत्कर्ष क्रीडा मंडळ व हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 56 वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत मुंबई उपनगर, बिड, रायगड, सातारा, पालघरची विजयी घोडदौड या संघांनी आपआपल्या गटात विजय मिळवत जोरदार खेळाची सुरवात केली.

पुरुषांच्या ब गटातील अतिशय अतीतटीच्या झालेल्या सामन्यात रायगडने धुळ्यावर 18-17 असा एक गुणाने विजय मिळवला. या सामन्यात रायगडच्या कौशल राणेने दोन मिनिटे वीस सेकंद संरक्षण केले व तीन खेळाडू बाद केले, अनिकेत पाटीलने एक मिनिट तीस सेकंद व एक मिनिट संरक्षण करत चार खेळाडू बाद केले तर साहिल जाधवने दोन मिनिट तीस सेकंद संरक्षण करून एक खेळाडू बाद केला तर धुळ्याच्या आकाश भिलने एक मिनिट चाळीस सेकंद संरक्षण केले व तीन खेळाडू बाद केले. विकी पावराने एक मिनिटे व एक मिनिटं सुदर्शन करून चार खेळाडू बाद केले मात्र संघासाठी विजयश्री खेचून आणण्यात ते अपयशी ठरले.

पुरुषांच्या ड गटातील सामन्यात साताऱ्याने औरंगाबादचा 14-13 असा एक डाव एक गुणाने पराभव केला. साताऱ्याच्या रोहित रेणुसेने दोन मिनिटे वीस मिनिटे संरक्षण केले, सागर थोरातने दोन मिनिटे दहा सेकंद संरक्षण केले, राजेंद्र पवारने एक मिनिट वीस सेकंद व एक मिनिट सेकंद संरक्षण करून चार खेळाडू बाद केले व श्रेयस पाटील ने दोन मिनिटे संरक्षण करून तीन खेळाडू बाद केले. पराभूत औरंगाबाद च्या योगेश भोगेने एक मिनिट संरक्षण करून दोन खेळाडू बाद केले व आकाश खोजने तीन खेळाडू बाद केले.

पुरुषांच्या फ गटातील सामन्यात पालघर विरुद्ध नांदेड या सामन्यात पालघरने 18-07 असा एक डाव 11 गुणांनी विजय संपादन केला. पालघरच्या सचिन सोनारने तीन मिनिटे तीस सेकंद संरक्षण केले, गौरव म्हात्रेने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण केले व दोन खेळाडू बाद केले, सुमिध तांडेलने दोन मिनिटे संरक्षण करून तीन खेळाडू बाद केले व रोनक टेमकरने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण केले. तर नांदेडच्या नदीम अब्दुल ने दोन खेळाडू बाद केले तर इतर खेळाडूंना विशेष कामगिरी करता आली नाही.

पुरुषांच्या क गटातील सामन्यात बीडने लातूरचा 14-07 असा एक डाव सात गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात बीडच्या विजय शिंदेने 3:30, 2:00 मिनिटे संरक्षण केले व पाच खेळाडू बाद केले, दिपक घोडकेने 2:00 मिनिटे संरक्षण केले व तीन खेळाडू बाद केले, तुकाराम करांडेने 2:50 मिनिटे संरक्षण केले व एक खेळाडू बाद केला तर लातूरच्या गोविंद आचावलेने 1:30 मिनिटे संरक्षण केले व तीन खेळाडू बाद केले देवीदास गुंडवाडने 1:30 मिनिटे संरक्षण केले व एक खेळाडू बाद केला.    

आज झालेल्या महिलांच्या सामन्यात मुंबई उपनगरने सिंधुदुर्गाचा 20-03 असा एक डाव सतरा गुणांनी धुवा उडवला. या सामन्यात मुंबई उपनगरच्या आरती कदमने नाबाद तीन मिनिटं संरक्षण केले व चार खेळाडूंना बाद केले, अक्षदा कदमने दोन मिनिटे वीस सेकंद संरक्षण केले, साक्षी वाफेलकरने पाच खेळाडू बाद केले तर श्वेताली नर व नेहा घाडीगावकरने तीन-तीन खेळाडू बाद केले तर पराभूत सिंधुदुर्गच्या एकाही खेळाडूला उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही.

महिलांच्या ए गटातील सामन्यात बीडने लातूरचा 13-09 असा चार गुणांनी पराभव केला या सामन्यात बीडच्या वैष्णवी बनने दोन्ही डावात प्रत्येकी दोन-दोन मिनिटे संरक्षण केले व तीन खेळाडूंना बाद केले निकिता मस्केने दोन मिनिटं व एक मिनिट तीस सेकंद संरक्षण केले व दोन खेळाडू बाद केले, संध्या पूर्भेने दोन मिनिटे व एक मिनिट तीस सेकंद संरक्षण करून दोन खेळाडू बाद केले त्याचबरोबर वैष्णवी शिंदेने दोन मिनिटे व एक मिनिट संरक्षण करून एक खेळाडू बाद केला. तर पराभूत लातूरच्या अक्षता कुलकर्णीने दोन मिनिट तीस सेकंद व एक मिनिट चाळीस सेकंद संरक्षण केले, आरती पारसेवारने  दोन्ही डावात 1:30-1:30 मि. संरक्षण केले व दोन खेळाडू बाद केले मात्र त्यांच्या इतर खेळाडूंना उल्लेखनीय कामगिरी न करता आल्यामुळे मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
 

Web Title: State Championship and Selection Trials Kho-Kho: Mumbai Suburbs, Bid, Raigad won first match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.