"माझ्या पतीला पुरूषांमध्ये इंटरेस्ट..."; वर्ल्ड चॅम्पियन स्वीटी बूराचा खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 15:00 IST2025-03-27T14:59:50+5:302025-03-27T15:00:24+5:30
स्वीटी आणि दीपक यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर १५ मार्चला हिसार पोलीस ठाण्यात दीपकला बोलवण्यात आले होते.

"माझ्या पतीला पुरूषांमध्ये इंटरेस्ट..."; वर्ल्ड चॅम्पियन स्वीटी बूराचा खळबळजनक आरोप
हिसार - माझ्या पतीला पुरूष आवडतात असा खळबळजनक आरोप आंतरराष्ट्रीय बॉक्सर स्वीटी बूरा हिने तिचा पती कबड्डी प्लेयर दीपक हुड्डावर केला आहे. हरियाणातील या खेळाडू जोडप्यातील घरगुती वाद गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहेत. आता हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले आहे. त्यात सोशल मीडियावर दीपक हुड्डा आणि स्वीटी बूरा यांच्यातील वादाशी संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अलीकडेच स्वीटी आणि दीपक यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता.
स्वीटी बूराने भारतीय कबड्डी टीमचा माजी कॅप्टन दीपक हुड्डावर मारहाणीचा आरोप लावला होता. त्याशिवाय पतीने १ कोटी आणि फॉर्च्यूनरची मागणी केल्याचा दावा केला होता. तर दीपकनेही स्वीटी बूराविरोधात हिसार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यात स्वीटी आणि तिच्या मामावर मारहाणीचा आरोप केला होता. त्यावेळी दोन्हीकडील लोकांनी फसवणूक, मारहाण, हुंड्यासाठी छळ या प्रकरणी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते.
स्वीटी आणि दीपक यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर १५ मार्चला हिसार पोलीस ठाण्यात दीपकला बोलवण्यात आले होते. त्यावेळी स्वीटी बूरा आणि तिच्या नातेवाईकांनाही बोलावले. याबाबत चौकशी सुरू होती त्याचवेळी स्वीटी आणि दीपक यांच्यात वादावादी झाली आणि दोघे झटापटीवर उतरले. आता पुन्हा एकदा स्वीटी बूराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडिओ पोस्ट करत पती दीपक हुड्डावर गंभीर आरोप लावले आहेत. व्हायरल व्हिडिओ अर्धवट असून पोलीस ठाण्यात अन्य काही गोष्टी झाल्या त्या व्हिडिओत दाखवल्या नसल्याचं स्वीटी बूराने म्हटलं.
माझ्या पतीला पुरूषांमध्ये इंटरेस्ट...
या प्रकरणात स्वीटी बूराने नवा दावा केला आहे. माझ्या पतीला पुरूषांमध्ये इंटरेस्ट आहे, हे मला लग्नानंतर कळलं. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. जे मी कोर्टात सादर करेन. हिसार पोलीस आणि दीपक हुड्डा मिळून माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहेत. मला पोलीस ठाण्यात बोलावून उकसवायचे, दीपक हुड्डा माझ्या चारित्र्यावर खूप घाण घाण बोलत होता. अर्धा तास हे सर्व सुरू होते परंतु व्हिडिओत ते काही रेकॉर्ड नाही. हिसारचे एसपी आणि दीपक हुड्डाने हे प्लॅनिंगनुसार केले असं तिने म्हटलं.
दरम्यान, जर मी इतकी वाईट आहे तर मला घटस्फोट का देत नाही. मला घटस्फोट हवाय, तो मला द्या बाकी मला काही नको, मी त्याला काही मागतही नाही असंही स्वीटी बूराने सांगितले आहे.