रिओ आॅलिम्पिक : तिरंदाजीमध्ये मानांकन फेरीत अतनु दास चमकला

By Admin | Updated: August 5, 2016 20:54 IST2016-08-05T20:37:32+5:302016-08-05T20:54:20+5:30

रिओ आॅलिम्पिकची सुरुवात भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची ठरली असून तिरंदाजी स्पर्धेच्या मानांकन फेरीत भारताच्या अतनु दासने ६४ खेळाडूंमधून ५ वे स्थान पटकावले.

Rio Olympics: Atanu Das spins in archery rankings | रिओ आॅलिम्पिक : तिरंदाजीमध्ये मानांकन फेरीत अतनु दास चमकला

रिओ आॅलिम्पिक : तिरंदाजीमध्ये मानांकन फेरीत अतनु दास चमकला

ऑनलाइन लोकमत

रिओ डी जनेरिओ, दि. ०५ -  रिओ आॅलिम्पिकची सुरुवात भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची ठरली असून तिरंदाजी स्पर्धेच्या मानांकन फेरीत भारताच्या अतनु दासने ६४ खेळाडूंमधून ५ वे स्थान पटकावले. आता, यानंतर सुरु होणाऱ्या मुख्य स्पर्धेत अतनुला पाचवे मानांकन असेल. त्याचवेळी कोरियाच्या किम वूजिन याने अपेक्षित वर्चस्व राखताना तिरंदाजीच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक ७०० गुणांचा वेध घेत थेट जागतिक विक्रम नोंदवण्याचा पराक्रम केला.
यंदा तिरंदाजीमध्ये पुरुष गटात अतनूच्या रुपाने भारताचा एकमेव खेळाडू सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे अतनूने स्वत:ला पुरेपुर सिध्द करताना शानदार कामगिरी करीत ६८३ गुणांचा वेध घेत पाचवे स्थान पटकावले. मानांकन फेरीची सुरुवात २२ व्या स्थानावरुन करताना अतनुची सुरुवात खराब झाली. पहिले दोन नेम अवैध ठरल्यानंतर अतनुने शांतपणे कामगिरी करताना हळूहळी आपले मानांकन उंचावले.
पहिल्या डावात अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्या डावात अतनुने कामगिरी उंचावताना प्रथम अव्वल दहापर्यंत मजल मारली. तर अंतिम क्षणी सातत्य राखताना त्याने अखेरीस पाचव्या स्थानी नाव कोरले. आता मुख्य स्पर्धेत अतनु पाचवे मानांकन घेऊन भारताचे प्रतिनिधित्व करणार असून या फेरीतून अव्वल ३२ खेळाडू पुढच्या फेरीत आगेकूच करतील.

मानांकन फेरीत विश्वविक्रम
दरम्यान, तिरंदाजी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी कोरियाच्या किम वूजिनने विश्वविक्रम नोंदवताना ७०० गुणांचा सर्वाधिक वेध घेत अव्वल स्थान पटकावले. याआधी २०१२ साली लंडन आॅलिम्पिकमध्ये कोरियाच्याच डाँग-ह्यून याने ६९९ गुणांचा विश्वविक्रम नोंदवला होता.
.......................................

मानांकन फेरीतील अव्वल दहा खेळाडू :
१. किम वूजिन (कोरिया) ७०० (विश्वविक्रम)
२. एल्लिसन ब्रेडी (अमेरिका) ६९०
३. पास्कालुस्सी डेव्हीड (इटली) ६८५
४. वॅन डेन बर्ग (नेदरलँड) ६८४
५. अतनु दास (भारत) ६८३
६. कु बोंचन (कोरिया) ६८१
७. फुरुकोवा ताकाहरु (कोरिया) ६८०
८. वल्लाडोंट जीन-चार्ल्स (फ्रान्स) ६८०
९. वेई चून - हेंग (तैपई) ६७९
१०. रॉड्रिग्स लिएबाना जुआन इग्नासिओ (स्पेन) ६७८

Web Title: Rio Olympics: Atanu Das spins in archery rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.