Respond to commentators, I'm not finished, - Dutty Chand | मी संपलेली नाही, हे टीकाकारांना प्रत्युत्तर - द्युती चंद
मी संपलेली नाही, हे टीकाकारांना प्रत्युत्तर - द्युती चंद

नवी दिल्ली : धावपटू द्युती चंद हिने समलैंगिक संबंधांचा खुलासा करताच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तिच्याबद्दल नकारात्मक गोष्टी पसरविण्यात आल्या. करिअर संपल्याची अफवा पसरविण्यात आली. द्युतीने मात्र विश्व विद्यापीठ स्पर्धेत सुवर्ण जिंकून टीकाकारांची बोलती बंद केली. ‘मी संपलेले नाही. तुमच्या टीकेनंतर माझ्यात यश मिळविण्याची लालसा निर्माण झाली,’ अशी प्रतिक्रिया द्युती चंदने दिली.
२३ वर्षांच्या द्युतीने ९ जुलै रोजी नेपोली येथे विश्व विद्यापीठ स्पर्धेचे सुवर्ण जिंकले. समलैंगिक संबंधांची कबुली दिल्यानंतर तिच्यावर जी टीका झाली, त्या सर्व टीकाकारांना धारेवर धरताना आपण संपलो नाही, ही तर सुरुवात असल्याचे बुधवारी स्पष्ट केले. या खेळात सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला धावपटू बनली.
वृत्तसंस्थेशी बोलताना द्युती म्हणाली,‘अनेकांनी माझ्याविरुद्ध अर्वाच्य शब्द वापरले. द्युतीने खासगी आयुष्यावर फोकस केले असून खेळाकडे तिचे लक्ष नसल्याची टीका झाली. अ‍ॅथलेटिक्समधील करिअर संपल्याची अफवा पसरविण्यात आली. मात्र मी संपलेले नाही. अन्य लोकांसारखी मी देखील खासगी आयुष्याबद्दल चिंतेत असते. याच कारणास्तव मी आपल्या संबंधांची कबुली दिली. याचा अर्थ असा नव्हे की खेळाकडे माझे लक्ष नाही. माझ्यादृष्टीने संबंधांची कबुली देणे आवश्यक होते. आता माझा फोकस आधीच्या तुलनेत करिअरकडे अधिक आहे.’ (वृत्तसंस्था)

विश्व विद्यापीठ स्पर्धेत सुवर्ण जिंकताच द्युतीने टिष्ट्वट केले होते की, ‘माझा अपमान करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण मी आणखी वेगाने भरारी घेणार आहे.’ द्युतीला दोहा येथे या वर्षाअखेर होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये भाग घ्यायचा असून पुढील वर्षीच्या टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.

मोठ्या स्पर्धांसाठी विनंती!
द्युती म्हणाली, ‘विश्वस्तरावरील हे माझे पहिले सुवर्ण आहे. पुढचा रस्ता कठीण आहे. माझे लक्ष्य विश्व चॅम्पियनशिप व नंतर आॅलिम्पिक आहे. मला चाहत्यांचे मोठ्या संख्येने अभिनंदन संदेश येत असले तरी पाय जमिनीवर आहेत. आशिया किंवा युरोपमध्ये स्पर्धा खेळून पात्रता वेळ गाठायची इच्छा असल्याने भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाकडे मोठ्या स्पर्धांसाठी विनंती केली आहे.’


Web Title: Respond to commentators, I'm not finished, - Dutty Chand
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.