आॅलिम्पिक उद्घाटन सोहळ्याचा बेरंग करण्यासाठी निदर्शक सज्ज
By Admin | Updated: August 5, 2016 20:32 IST2016-08-05T20:32:51+5:302016-08-05T20:32:51+5:30
ब्राझीलच्या रियो दी जेनेरो येथे ३१ व्या आॅलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचा बेरंग करण्यासाठी निदर्शकांनी कंबर कसली आहे

आॅलिम्पिक उद्घाटन सोहळ्याचा बेरंग करण्यासाठी निदर्शक सज्ज
ऑनलाइन लोकमत
रिओ दी जेनेरो, दि. ५ : ब्राझीलच्या रियो दी जेनेरो येथे ३१ व्या आॅलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचा बेरंग करण्यासाठी निदर्शकांनी कंबर कसली आहे. देशातील विद्यमान राजकीय संकट आणि आर्थिक मंदीच्या विरोधात आपला आवाज बुलंद करून जगाचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्याची निदर्शकांची योजना आहे.
दक्षिण अमेरिकेत होणाऱ्या पहिल्या आॅलिम्पिक खेळाचा उद्घाटन सोहळा मारकना स्टेडियममध्ये होणार असून, तेथे ५0 हजारांपेक्षा जास्त प्रेक्षक आणि सहभागी होणारे ११ हजार खेळाडूंसह विविध देशातील राष्ट्राध्यक्ष स्टेडियममध्ये उपस्थित असणार आहेत. या रंगारंग सोहळ्याकडे जगभरातील क्रीडा रसिकांचे लक्ष असणार आहे; परंतु दुसरीकडे ब्राझीलमध्ये असंतोषी गटासाठीदेखील आपला विरोध मोठ्या व्यासपीठावर व्यापक प्रमाणात दर्शविण्याची एक मोठी संधी असणार आहे.
हॉटेल कोपाकबानाच्या बाहेर सकाळी आणि पुन्हा माराकाना स्टेडियमबाहेर विरोध दर्शविण्याची निदर्शकांची योजना आहे. माराकाना स्टेडियममध्ये आॅलिम्पिक मशालने ज्योत प्रज्वलित करताच स्पर्धेची सुरुवात होणार आहे.
त्याआधी निदर्शकांनी आॅलिम्पिक मशाल रिलेदरम्यानही विविध ठिकाणी विरोध दर्शविला. त्यामुळे दंगलविरोधी पोलिसांसोबत त्यांची झटापटदेखील झाली. याशिवाय निदर्शकांनी उद्घाटन सोहळ्यादरम्यान कार्यवाहक राष्ट्रपती माईकल तेमेर यांच्याविरुद्ध संताप व्यक्त करण्याचीदेखील धमकी दिली आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या चोख बंदोबस्तामुळे निदर्शनकाऱ्यांची संख्या काही हजारांपर्यंतच असेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे; परंतु निदर्शकांच्या विरोधामुळे खेळातील या महाकुंभाच्या आयोजनाचा बेरंग होण्याची शक्यता आहे.
ब्राझीलचे एक स्थानिक पत्रकार आणि निदर्शनकारी मॅन्युएला त्रिनिदादे यांनी तर आॅलिम्पिक खेळ हे देशासाठी मोठी आपत्ती असल्याचे म्हटले आहे. आम्ही आमचा राग तेमेर यांच्याविरुद्ध दाखवणार आहोत. आम्ही त्यांना सत्तेबाहेर पाहू इच्छितो. ते एक जखमेप्रमाणे आहेत. जनता अशा सरकारला स्वीकारू नये, अशी आमची इच्छा आहे, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, ब्राझीलच्या प्रसिद्धीमाध्यमांनुसार अधिकारी राष्ट्रपती तेमेर यांचे उद्घाटन सोहळ्यातील भाषण संक्षिप्त ठेवण्याची योजना बनवीत आहेत. ज्यामुळे लोकांना त्यांचा विरोध करण्याची जास्त संधी मिळणार नाही. त्याचबरोबर निदर्शकांचा आवाज जोरदार संगीतात दबून जाईल, असे आयोजकांना वाटते. तेमेर यांनीदेखील निदर्शकांच्या हुटिंगसाठी आपण तयार असल्यचे सांगितले.