"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 19:53 IST2025-07-28T19:53:10+5:302025-07-28T19:53:40+5:30

Raj Thackeray, Chess World Champion Divya Deshmukh: दिव्या देशमुख ही बुद्धिबळ विश्वविजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय ठरली

Raj Thackeray appaluds new chess world champion divya deshmukh from nagpur marathi girl FIDE winner | "महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक

"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक

Raj Thackeray, Chess World Champion Divya Deshmukh: नागपूरच्या अवघ्या १९ वर्षांच्या दिव्या देशमुख हिने जॉर्जियातील बटुमी येथे खेळल्या गेलेल्या Women's Chess World Cup Final मध्ये ३८ वर्षांच्या ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला (Koneru Humpy) पराभूत केले. दोन्ही खेळाडूंमधील सुरूवातीचे सामने अनिर्णित राहिले होते. त्यानंतर आज, सोमवारी रॅपिड राऊंड्स खेळवण्यात आल्या. त्यात एकात दोघींनी बरोबरी साधली. पण दुसऱ्या राऊंडमध्ये दिव्याने हम्पीला माघार घेण्यात भाग पाडले. महिला बुद्धिबळ विश्वचषकाचे विजेतेपद जिंकणारी दिव्या देशमुख पहिलीवहिली भारतीय ठरली. तिच्या या विजयानंतर, राज ठाकरे यांनी खास शैलीत तिचे कौतुक केले.

"अवघ्या १९ वर्षाच्या मराठमोळ्या दिव्या देशमुखने बुद्धिबळाच्या (FIDE) विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हंपीला हरवून विश्वविजयपद मिळवलं. दोन भारतीय महिला बुद्धिबळाच्या पटावर विश्वविजयासाठी चाली रचत आहेत हे दृश्यच खूप सुंदर आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत भारताकडेच विश्वविजय पद आलं असतं हा देखील आनंदाचा भाग. पण दिव्याचं मनापासून अभिनंदन. या निमित्ताने अधिकाधिक महिला बुद्धिबळपटू तयार होऊ देत, त्यांना विजयाला गवसणी घालण्याची प्रेरणा मिळू दे हीच इच्छा... महाराष्ट्राकडे बुद्धी आणि बळ दोन्ही ओतप्रोत आहे, ते जेंव्हा जेंव्हा महाराष्ट्राचं नाव मोठं करायला वापरलं जातं, तेंव्हा खूप आनंद होतो. दिव्या तुझं पुन्हा एकदा अभिनंदन..." अशा शब्दांत राज ठाकरे यांनी दिव्या देशमुखची स्तुती केली.

----

सुप्रिया सुळेंनीही केलं अभिनंदन

"जॉर्जिया येथे पार पडलेल्या महिला विश्वचषक बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुख हिने विजेतेपद पटकावले. भारताचीच कोनेरु हंपी उपविजेती ठरली आहे. दिव्या १९ वर्षांची असून ती नागपूरची रहिवासी आहे. दिव्याचे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन तथा पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा," असे ट्विट त्यांनी केले.

दिव्याने 'असा' मिळवला विजय

दिव्या आणि हम्पी दोघींनीही चिनी खेळाडूंना पराभूत करून अंतिम सामन्यात धडक मारली होती. दोन्ही खेळाडूंमधील सुरुवातीचे सामने अनिर्णित राहिले. शनिवार आणि रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने (Koneru Humpy) नवीन बुद्धिबळ स्टार दिव्या देशमुखला आघाडी मिळवू दिली नाही. त्यामुळे मूळ सामना १-१ गुणांनी बरोबरीत राहिला. आज, सोमवारी खेळल्या गेलेल्या रॅपिड राउंडमध्ये जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानी असलेल्या नागपूरच्या दिव्या देशमुख हिने पहिल्या गेममध्ये पांढऱ्या सोंगट्यांसह सुरुवात केली. आक्रमक खेळ करत तिने जागतिक क्रमवारीत ५व्या स्थानी असलेल्या कोनेरू हम्पीशी आधी बरोबरी साधली. मग रॅपिड राउंडच्या दुसऱ्या गेममध्ये काळ्या सोंगट्यांसह खेळताना दिव्याने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले आणि कोनेरूला पराभवाची धूळ चारली.

Web Title: Raj Thackeray appaluds new chess world champion divya deshmukh from nagpur marathi girl FIDE winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.