रदवांस्काचा धक्कादायक पराभव
By Admin | Updated: May 31, 2014 05:53 IST2014-05-31T05:53:05+5:302014-05-31T05:53:05+5:30
महिला विभागात मात्र तिसर्या मानांकित पोलंडच्या अॅग्निस्का रदवांस्काला मात्र धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला

रदवांस्काचा धक्कादायक पराभव
पॅरिस : जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानावर असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच, चौथे मानांकन प्राप्त स्वीत्झलंडचा रॉजर फेडरर, माजी विजेती रशियाची मारिया शारापोव्हा यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत आपापल्या गटात चौथ्या फेरीत प्रवेश केला. महिला विभागात मात्र तिसर्या मानांकित पोलंडच्या अॅग्निस्का रदवांस्काला मात्र धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. दुसर्या मानांकित जोकोविचने क्रोएशियाच्या मारिन सिलिचची झुंज ६-३, ६-२, ६-७, ६-४ ने मोडून काढली तर १७ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदाचा मानकरी फेडररने ३१ व्या मानांकित रशियाच्या दिमित्री तुर्सुनोव्हववर ७-६, ६-७, ६-२, ६-४ ने मात केली. महिला विभागात सातव्या मानांकित शारापोव्हाने अर्जेन्टिनाच्या पाउला ओर्मेनियाचा ६-०, ६-० ने धुव्वा उडवित विजेतेपदाची प्रबळ दावेदार असल्याची प्रचिती दिली. तिसर्या मानांकित पोलंडच्या अॅग्निस्का रदवांस्काला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या तिसर्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला. रदवांस्काच्या पराभवामुळे महिला विभागात अव्वल तीन खेळाडू जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेले आहेत. अव्वल मानांकित व गतविजेत्या अमेरिकेच्या सेरेना विलियम्सला दुसर्या फेरीत तर आॅस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन चीनच्या ली ना हिला पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर रदवांस्काला जेतेपदाची दावेदार मानल्या जात होते, पण तिचे आव्हान तिसर्याच फेरीत संपुष्टात आले. रदवांस्काला क्रोएशियाच्या बिगरमानांकित एल्जा टामजानोव्हिककडून ६-४, ६-४ ने पराभव स्वीकारावा लागला. जानेवारी महिन्यात आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणार्या रदवांस्काला फिलिप चेट्रियर कोर्टवर लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. २१ वर्षीय एल्जाने सलग सेट््समध्ये विजय मिळवित रदवांस्काला गाशा गुंडाळण्यात भाग पाडले. रशियाच्या मारिया शारापोव्हाला विजेतेपदाचा दावेदार मानल्या जात आहे. त्याआधी, गुरुवारी चौथे मानांकन प्राप्त रोमानियाच्या सिमोना हालेप आणि माजी विम्बल्डन चॅम्पियन चेक प्रजासत्ताकची पेत्रा क्वितोव्हा यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत तिसरी फेरी गाठली. सिमोनाने ब्रिटनच्या हिथर वॉटसनचा ६-२, ६-४ ने तर पाचव्या मानांकित क्विटोव्हाने न्यूझीलंडच्या मरिना इव्हाकोव्हिचचा ६-४, ६-४ ने पराभव केला. दहावे मानांकन प्राप्त इटलीची सारा इराणी, ११ वे मानांकन प्राप्त सर्बियाची अॅना इव्हानोविच, रोमानियाची सोराना ख्रिस्टी, जर्मनीची आंद्रिया पेत्कोचिव्ह, रशियाची एकातेरिना मकारोव्हा तिसरी फेरी गाठण्यात यशस्वी ठरल्या. पुरुष विभागात १२ वे मानांकन प्राप्त फ्रान्सचा रिचर्ड गास्के, १४ वे मानांकन प्राप्त इटलीचा फॅबियो फोग्निनी आणि २३ वे मानांकन प्राप्त गेल मोंफिल्स तिसरी फेरी गाठण्यात यशस्वी ठरले. (वृत्तसंस्था)