Pro Kabaddi and Asian Games player will not allow in Kabaddi World Cup? | वर्ल्ड कपमध्ये प्रो कबड्डी व आशियाई संघातील खेळाडूंना 'No Entry'? 
वर्ल्ड कपमध्ये प्रो कबड्डी व आशियाई संघातील खेळाडूंना 'No Entry'? 

ठळक मुद्देपुढील वर्षी मलेशियात होणार कबड्डी वर्ल्ड कप2 ते 15 एप्रिल या कालावधीत होणार 146 सामने प्रो कबड्डी व आशियाई स्पर्धेतील खेळाडूंना संधी नाही

मुंबई : प्रो लीगने कबड्डी घराघरात पोहोचवली.. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांना या लीगने आपलंसं केलं. गावाखेड्यातला खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थरावर ओळखला जाऊ लागला. मात्र या यशासोबत अनेक वादही झाले आणि कबड्डी संघटनांमध्ये फुटीचे बीज रोवले गेले. जनार्दन गेहेलोत यांच्या घराणेशाहीला आव्हान देणारी नवी राष्ट्रीय संघटना स्थापन झाली. आंतरराष्ट्रीय स्थरावरही फुटीचे राजकारण सुरु आहे आणि त्याचा फटका प्रो कबड्डी लीगमधील स्टार खेळाडूंना बसण्याची चिन्हे आहेत. नव्याने स्थापन झालेल्या वर्ल्ड कबड्डी फेडरेशने २०१९ मध्ये कबड्डी वर्ल्ड कप घेण्याचे ठरवले आहे. मात्र यात प्रो कबड्डी लीग व आशियाई स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना प्रवेश नाकारण्यात आला आहे. 


आजी- माजी खेळाडूंनी एकत्र येऊन तयार केलेल्या न्यू कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचा संघ २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये खेळवण्यात येणार आहे. मलेशियातील मेलाका यथे वर्ल्ड फेडरेशनच्या मान्यतेने आणि मलेशिया कबड्डी फेडरेशनच्या यजमानपदाखाली ही वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार २ ते १५ एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. पाच खंडातील ४० देशांतून जवळपास १००० खेळाडू स्पर्धेत खेळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. कॅनडा, भारत, मॉरिशस, इजिप्त, ऑस्ट्रेलिया, केनिया आदी देशांसह ३२ पुरुष व २४ महिला संघ सहभागी होणार आहेत. 


१४ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत १४६ सामने होणार आहेत. स्पर्धेचे अंतिम रुपरेषा कशी असेल हे अद्याप स्पष्ट नाही. या सर्व सामन्यांच्ये थेट प्रक्षेपण होणार आहे. मात्र, या वर्ल्ड कप स्पर्धेत २०१८ च्या आशियाई  आणि प्रो कबड्डीत खेळलेल्या खेळाडूंना भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करता येणार नाही. ते सर्व खेळाडू आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाशी संलग्न आहेत आणि त्यांचा व वर्ल्ड फेडरेशन यांच्यात वाद सुरु आहे.
 

Web Title: Pro Kabaddi and Asian Games player will not allow in Kabaddi World Cup?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.