पाकिस्तानची बलाढ्य आफ्रिकेवर २९ धावांनी मात
By Admin | Updated: March 7, 2015 14:31 IST2015-03-07T14:25:17+5:302015-03-07T14:31:09+5:30
पाकिस्तानने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा २९ धावांनी पराभव करत वर्ल्डकपमधील आव्हान जीवंत ठेवले आहे.

पाकिस्तानची बलाढ्य आफ्रिकेवर २९ धावांनी मात
ऑनलाइन लोकमत
ऑकलंड, दि. ९ - पाकिस्तानने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा २९ धावांनी पराभव करत वर्ल्डकपमधील आव्हान जीवंत ठेवले आहे. पाकिस्तानच्या वेगवान मा-यासमोर आफ्रिकेच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारली.
वर्ल्डकपमध्ये शनिवारी पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमने सामने होते. सुरुवातीचे दोन सामने गमावल्याने टीकेचे धनी ठरलेल्या पाकिस्तानसाठी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवणे आवश्यक होते. दक्षिण आफ्रिकेने सलग दोन सामन्यांमध्ये ४०० धावांचा डोंगर उभा करत पाकला धोक्याचा इशाराच दिला होता. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात दोन वेळा पावसाचा व्यत्यय आल्याने सामना ४७ षटकांचा खेळवण्यात आला. आफ्रिकेच्या मा-यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. कर्णधार मिसबाह उल हकच्या ५६ धावा आणि सलामीवीर सरफराझ अहमदच्या ४९ धावांच्या खेळीने पाकिस्तानने २०० चा टप्पा ओलांडला. पाकिस्तानचा डाव ४६.४ षटकांत २२२ धावांमध्ये आटोपला. डकवर्थ लुईस नियमासमोर आफ्रिकेसमोर विजयासाठी २३२ धावांचे लक्ष्य होते. आफ्रिकेच्या वतीने डेल स्टेनने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.
हाशिम आमला, फाफ डू प्लेसिस, रिली रोसोवू, जेपी ड्यूमिनी, एबी डिव्हिलियर्स असा दर्जेदार फलंदाजांचा समावेश असलेला आफ्रिकन संघ हे लक्ष्य सहज गाठेल असे दिसत होते. मात्र पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत आफ्रिकेची भक्कम फलंदाजी भेदली. सलामीवीर क्विंटन डी कॉक भोपळा न फोडताच माघारी गेला. फाफ डू प्लेसिसही संघाच्या ६७ धावा झाल्या असताना तंबूत परतला. त्यापाठोपाठ हाशिम आमला ३३ धावांवर बाद झाला. आफ्रिकेने १० धावांमध्ये ४ विकेट गमावल्याने आफ्रिकेची अवस्था ५ बाद ७७ अशी झाली होती. कर्णधार एबी डिव्हिलियर्सने जेपी ड्यूमिनीच्या साथीने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण ड्यूमिनीही स्वस्तात बाद झाला. डिव्हिलियर्सने एकाकी झूंज देत ७७ धावा केल्या. त्याच्या अर्धशतकीय खेळीने आफ्रिकेला २०० धावा करता आल्या. डिव्हिलियर्स बाद झाल्यावर आफ्रिकेचा डाव ३३.३ षटकांत २०२ धावांवर आटोपला. पाकिस्तानचा विकेटकिपर सरफराझ अहमदने सहा झेल टिपून पाकिस्तानच्या विजयात मोलाचे योगदान दिले. पाकिस्तानतर्फे मोहम्मद इरफान, राहत अली व वहाब रियाझ या त्रिकुटाने प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.
या विजयामुळे पाकिस्तान गुणतालिकेत तिस-या स्थानावर आला आहे. दबावाखाली खेळण्यात आफ्रिकेचा संघ अपयशी ठरतो हे या सामन्यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले.