भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:41 IST2025-12-19T12:38:59+5:302025-12-19T12:41:52+5:30
Pakistan player Ubaidullah Rajput: भारतीय जर्सी घालून तिरंगा फडकावल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
Pakistan player Ubaidullah Rajput: पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू उबैदुल्लाह राजपूत सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. भारतीय संघाकडून खेळल्याचा आरोप झाल्यानंतर पाकिस्तानकबड्डी फेडरेशन (PKF) ने त्याच्याविरोधात कठोर शिस्तभंग कारवाईचे संकेत दिले आहेत. या प्रकरणावर अंतिम निर्णय डिसेंबरअखेर होण्याची शक्यता आहे.
बहरीनमधील खासगी स्पर्धेमुळे वाद
उबैदुल्लाह राजपूत याने 16 डिसेंबर रोजी बहरीनमध्ये झालेल्या GCC कप या खासगी कबड्डी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेदरम्यान तो भारतीय संघाकडून खेळला. एवढच नाही, तर त्याने भारतीय जर्सी घालून भारतीय ध्वजही फडकावला, ज्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामुळे पाकिस्तानमध्ये मोठा वाद निर्माण झाला असून, फेडरेशनने याची गंभीर दखल घेतली आहे.
पाकिस्तान कबड्डी फेडरेशनची नाराजी
पाकिस्तान कबड्डी फेडरेशनने हा प्रकार अनुशासनहीनतेचा असल्याचे मानले आहे. PKF चे सचिव राणा सरवर याने सांगितले की, या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी 27 डिसेंबर रोजी आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत उबैदुल्लाह राजपूतसह काही अन्य खेळाडूंवर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. राणा सरवरने स्पष्ट केले की, बहरीनमधील या स्पर्धेत 16 पाकिस्तानी खेळाडूंनी भाग घेतला होता, मात्र ही पाकिस्तानची अधिकृत राष्ट्रीय टीम नव्हती. या स्पर्धेसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. कोणालाही NOC जारी करण्यात आली नव्हती आणि फेडरेशनला याची पूर्वकल्पनाही नव्हती.
भारतीय झेंडा फडकावल्यावर आक्षेप
PKF सचिवाने सांगितले की, एका राष्ट्रीय खेळाडूने भारताकडून खेळणे आणि भारतीय झेंडा फडकावणे आम्हाला मान्य नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. यासोबतच स्वतःला प्रमोटर म्हणवणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. गैरकायदेशीर स्पर्धा आयोजित करून पाकिस्तानची बदनामी सहन केली जाणार नाही, असा इशाराही दिला.
उबैदुल्लाह राजपूतचे स्पष्टीकरण
या वादानंतर उबैदुल्लाह राजपूत याने सोशल मीडियावर जाहीर माफी मागितली आहे. त्यांनी सांगितले की, मला बहरीनमधील या स्पर्धेसाठी एका खासगी टीमकडून आमंत्रण देण्यात आले होते. सुरुवातीला मला टीमचे नाव ‘इंडिया’ असल्याची कल्पना नव्हती. मैदानात उतरताना मित्रांकडून समजले की, मी भारताकडून खेळतोय. मी आयोजकांना भारत-पाकिस्तान अशी नावे वापरू नका, असे सांगितले होते. हा स्थानिक सामना असल्याची घोषणा करण्याची विनंतीही केली होती, असे त्याने स्पष्ट केले. तसेच, मी पाकिस्तानी आहे आणि माझे आयुष्य पाकिस्तानसाठी समर्पित आहे. माझ्यामुळे कुणाचे मन दुखावले असेल, तर मी मनापासून माफी मागतो, असेही तो म्हणाला.