पाकिस्तान पराभूत, सेमीफायनलमध्ये भारताची गाठ कागारूंशी
By Admin | Updated: March 20, 2015 16:10 IST2015-03-20T09:35:27+5:302015-03-20T16:10:19+5:30
विश्वचषकाच्या उपउपांत्य फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा सहा गडी आणि ९७ चेंडू राखून सहज पराभव केला आहे.

पाकिस्तान पराभूत, सेमीफायनलमध्ये भारताची गाठ कागारूंशी
>ऑनलाइन लोकमत
अॅडलेड, दि. २० - विश्वचषकाच्या उपउपांत्य फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा सहा गडी आणि ९७ चेंडू राखून सहज पराभव केला आहे. आता सेमी फायनलमध्ये २६ मार्च रोजी कांगारुंची गाठ भारताशी पडणार आहे. कप्तान स्मिथ आणि शेन वॅटसनने प्रत्येकी अर्धशतक झळकावले आणि २१४ धावांचे लक्ष्य लिलया पार केले. वॅटसन व नंतर मॅक्सवेल या दोघांचाही एकेक झेल वहाबच्या गोलंदाजीवर पाकच्या क्षेत्ररक्षकांनी टाकला, अन्यथा सामन्यात अधिक रंगत आली असती. चार बळी घेत पाकिस्तानच्या फलंदाजीचा कणा मोडणा-या हेझेलवूडला समानावीराचा किताब देण्यात आला.
वर्ल्डकपमधील तिस-या क्वार्टर फायनलमध्ये पहिली फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या भेदक मा-यासमोर पाकिस्तानची फलंदाजी कोसळली आणि पाकिस्तानचा डाव २१३ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २१४ धावांचे माफक आव्हान असले तरी पाकची गोलंदाजी काही चमत्च्याकार करेल का याची उत्सुकता होती.
पाकिस्तानने नाणेेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु सर्फराज अहमद आणि अहमद शेहजाद ही सलामीची जोडी अवघ्या २४ धावांमध्येच तंबूत परतली. सर्फराज १० तर शेहजाद ५ धावांवर बाद झाला. यानंतर हारिस सोहेल व कर्णधार मिसबाह उल हक या जोडीने पाकचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मिसबाह ३६ धावांवर असताना बाद झाला. यानंतर हारिस सोहेल ४१ धावांवर बाद झाला. उमर अकमल, शाहिद आफ्रिदीही स्वस्तात माघारी परतले. वहाब रियाझ आणि एहसान आदिल या तळाच्या फलंदाजांनी १६ व १५ धावांची खेळी करत पाकिस्तानला २०० चा टप्पा गाठून दिला. शेवटी ४९.५ षटकांत २१३ धावांवर पाकिस्तानचा डाव संपुष्टात आला.
ऑस्ट्रेलियातर्फे जॉस हॅझलवूडने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मिशेल स्टार्क व ग्लॅन मॅक्सवेलने प्रत्येकी दोन तर मिशेल जॉन्सनने एक विकेट घेतली. या सामन्यामध्ये पाकिस्तानचे सर्व फलंदाज झेलबाद झाले. आता ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर नमवत भारत फायनलमध्ये प्रवेश करतो याकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले आहे.