भारताचे दिग्गज आयएसएलमधून आउट
By Admin | Updated: July 18, 2014 02:21 IST2014-07-18T02:21:49+5:302014-07-18T02:21:49+5:30
सुनील छेत्री आणि रॉबिन सिंगसह अव्वल फुटबॉलपटूंचा जलवा या वेळच्या इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) दिसणार नाही

भारताचे दिग्गज आयएसएलमधून आउट
स्वदेश घाणेकर, नवी दिल्ली
सुनील छेत्री आणि रॉबिन सिंगसह अव्वल फुटबॉलपटूंचा जलवा या वेळच्या इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) दिसणार नाही.
या लीगला आय लीग स्पर्धेचा विरोध असून, तो आणखी चिघळला आहे. नवी दिल्लीत आज झालेल्या कार्यक्र मात अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सचिव कुशल दास यांनी सांगितले की, या दोन्ही लीगमधील वाद अजून मिटलेला नाही. त्यामुळे यंदातरी अव्वल खेळाडू आयएसएलमध्ये खेळणार नाहीत. मात्र पुढील सत्रापर्यंत हा वाद मिटेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
आय लीगमध्ये दर्जात्मक सुधारणा करावयाचे सोडून ही नवीन लीग जन्माला घालून अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला काय साधायचे आहे, असा सवाल करीत गतविजेत्या बंगळुरू एफसीसह काही प्रमुख आय लीग संघांनी आयएसएलला विरोध केला आहे.
यासंदर्भात अनेक बैठकाही झाल्या. पण त्या निष्फळ ठरल्या, असेही दास यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दास यांनी आयएसएल भारतीय फुटबॉल क्षेत्रात क्रांती आणेल, असा विश्वास व्यक्त केला. या नव्या लीगमुळे भारतातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होणार असून, याचा देशाला नक्कीच फायदा होईल, असेही ते म्हणाले.