मुंबई : पाचव्या अध्यक्षीय चषक मुंबई जिल्हा कॅरम स्पर्धेत मुलांच्या १८ वर्षांखालील गटात ओमकार नेटकेने विजेतेपद पटकावताना शाह आलम खानला नमवले. मुलींमध्ये अमुल्ल्या राजुने बाजी मारली. माटुंगा येथील सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्युटमध्ये झालेल्या या स्पर्धेत ओमकारने आक्रमक खेळ करत शाह आलमला २५-०२, २५-०० असे नमवले. मुलींच्या अंतिम सामन्यात अमुल्याने देखील सरळ दोन गेममध्ये बाजी मारत वैभवी शेवाळेचा २५-०७, २५-०८ असा फडशा पाडला.पुरुष गटात बलाढ्य संदीप देवरुखकरने संतोष जाधवचा २५-२०, २५-७ असा धुव्वा उडवून उपांत्य फेरी गाठली. रियाझ अकबर अलीने देखील उपांत्य फेरीत प्रवेश करताना प्रशांत मोरेला २५-६, २५-२३ असे नमवले. अन्य लढतीत पंकज पवार व योगेश घोंगडे यांनी देखील उपांत्य फेरीतील जागा निश्चित केली.महिला गटाच्या उपांत्य फेरीमध्ये आयेशा मोहम्मदने अनुभवी अनुपमा केदारचे तगडे आव्हान २५-०९, ०९-२५, २५-११ असे परतावून दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या बाजूला संभाव्य विजेत्या शिल्पा पळणीटकर आपल्या लौकिकानुसार आक्रमक विजय मिळवताना कसलेल्या प्रिती खेडेकरचे आव्हान २५-१०, २५-६ असे संपुष्टात आणले व अंतिम फेरी गाठली. (क्रीडा प्रतिनिधी )
ओमकार नेटके याचे शानदार विजेतेपद
By admin | Updated: June 17, 2015 01:43 IST