वयाच्या २५ व्या वर्षी ऑलिंपिक चॅम्पियननं घेतला संन्यास; एरियार्नच्या निर्णयानं चाहते हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 11:25 IST2025-10-17T11:24:46+5:302025-10-17T11:25:34+5:30
एरियार्न टिटमसने मागील वर्षी झालेल्या पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती

वयाच्या २५ व्या वर्षी ऑलिंपिक चॅम्पियननं घेतला संन्यास; एरियार्नच्या निर्णयानं चाहते हैराण
जगातील सर्वात यशस्वी जलतरणपटूंपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या एरियार्न टिटमसने अवघ्या २५ व्या वर्षी निवृत्तीचा निर्णय घेतल्याने चाहते हैराण झाले आहेत. चार वेळा एरियार्नने ऑलिंपिक स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले होते. तिने गुरुवारी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिच्या निवृत्तीची घोषणा केली. आयुष्यात पोहण्यापेक्षाही इतर महत्त्वाच्या गोष्टी आहेत असं तिने व्हिडिओत म्हटलं आहे.
अचानक का घेतला निर्णय?
टिटमसने सांगितले की, मला कायम पोहण्यास खूप रस होता. लहानपणापासून माझे ते स्वप्न आणि आवड राहिली आहे. परंतु आता मी काही काळ जेव्हा या गोष्टीपासून दूर राहिले तेव्हा आयुष्यात आणखीही खूप काही असल्याचं जाणवते. जे माझ्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचे आहे असं तिने म्हटलं. एरियार्ननं घेतलेल्या निर्णयाने चाहत्यांना आश्चर्यचकीत केले आहे.
पॅरिस ऑलिंपिकमध्ये रचला इतिहास
एरियार्न टिटमसने मागील वर्षी झालेल्या पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. तिने ४०० मीटर फ्री स्टाइलमध्ये अमेरिकन दिग्गज खेळाडू केटी लेडेकी आणि कॅनडाच्या समर मॅकिन्टोशवर मात करत गोल्ड मेडल पटकावले होते. विशेष म्हणजे यावेळी तिने नवीन विश्व रेकॉर्डही बनवला होता. एरियार्न टिटमसच्या नावावर एकूण ३३ आंतरराष्ट्रीय पदके आहेत. त्यात ४ ऑलिंपिक गोल्ड, ३ रौप्य पदके आणि एक कांस्य पदक जिंकले आहे. तसेच चार जागतिक जेतेपदेही तिच्या नावावर आहे. तिने केवळ तिच्या देशाच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला जलतरणात एक नवीन बेंचमार्क देखील स्थापित केला होता.
दरम्यान, एरियार्न टिटमसचे प्रशिक्षक आणि चाहत्यांना तिच्याकडून खूप अपेक्षा आहे. २०२८ मध्ये लॉस एंजेलिस ऑलिंपिक स्पर्धेत एरियार्न पुन्हा खेळात परतेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. परंतु एरियार्नच्या बोलण्यावरून तिने आता नवीन मार्ग निवडल्याचे दिसून येते. २५ व्या वर्षी निवृत्ती घेण्याचा निर्णय सोपा नव्हता परंतु आयुष्यातील नवीन इनिंग खेळण्यासाठी ती उत्सुक आहे असं तिच्या व्हिडिओतून तिने म्हटलं.