आता नजर आंतरराष्ट्रीय ‘सुवर्णा’वर! - अनुरा प्रभुदेसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 09:32 PM2017-12-11T21:32:52+5:302017-12-11T21:32:56+5:30

खेळाडूच्या जीवनातील सर्वात यशस्वी टप्पा असतो तो म्हणजे सुवर्णपदक मिळवणे. राष्ट्रीय पातळीवरील कांस्यपदक पटकाविल्यानंतर अनुरा प्रभुदेसाई हिनेही सुवर्णपदकाचे स्वप्न पाहिले होते

Now look at the international 'suvarna'! - Anurah Prabhudesai | आता नजर आंतरराष्ट्रीय ‘सुवर्णा’वर! - अनुरा प्रभुदेसाई

आता नजर आंतरराष्ट्रीय ‘सुवर्णा’वर! - अनुरा प्रभुदेसाई

Next

सचिन कोरडे : 

खेळाडूच्या जीवनातील सर्वात यशस्वी टप्पा असतो तो म्हणजे सुवर्णपदक मिळवणे. राष्ट्रीय पातळीवरील कांस्यपदक पटकाविल्यानंतर अनुरा प्रभुदेसाई हिनेही सुवर्णपदकाचे स्वप्न पाहिले होते. या पदकानजीक ती यापूर्वी पोहचलीही होती. मात्र, संधी थोडक्यात हुकली. असे असतानाही संयम, चिकाटी आणि जिद्द कायम राखत तिने प्रवास सुरूच ठेवला. अखेर सिक्कीम येथील राष्ट्रीय वरिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत अनुराने आपले स्वप्न साकारले. तिच्या पदकाचा रंग सोनेरी झाला. हे सुवर्णपदक गोव्याच्या बॅडमिंटन क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरले. असे सुवर्णमय यश मिळवून देणाºया अनुरा प्रभुदेसाई हिच्या नजरा आता आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकावर आहेत.

येत्या १९ डिसेंबरपासून कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे सुरू होणाºया आंतरराष्ट्रीय चॅलेंज स्पर्धेसाठी ती  तयारी करीत आहे. अनुरा हिने मुंबई येथून ‘लोकमत’शी संवाद साधला. त्यात तिने आपला पुढील प्रवास व्यक्त केला. 

राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती म्हणून तू गोव्याची पहिली बॅडमिंटनपटू ठरलीस, तुझ्या भावना काय आहेत? यावर अनुराने मोठ्या अभिमानाने उत्तर दिले. जीवनातील यशाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यासारखा वाटतोय. कोणत्याही खेळाडूसाठी सुवर्ण हे लक्ष्य असते. त्यातच राष्ट्रीय सुवर्ण मिळाल्याचे खूप समाधान आहे. रौप्यपदकापर्यंत पोहचले होते. याच क्षणाच्या प्रतीक्षेत होते. ती इच्छा पूर्ण झालीय. आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदकाचे स्वप्न आहे. मानांकन स्पर्धा खूप खेळली, आता चॅलेंज आणि ग्रांपीसारख्या स्पर्धांवर लक्ष केंद्रित करायचे आहे, असे सांगत तिने आता मागे वळणार नसल्याचे संकेत दिलेत. 

सिक्कीम येथील स्पर्धा आव्हानात्मक होती काय, यावर तिने बिनधास्तपणे उत्तर दिले. ती म्हणाली, या स्पर्धेत मीच टॉपवरची खेळाडू होते. एकेरी आणि दुहेरी या दोन्ही गटांत भारतात नंबर वनची खेळाडू असल्याने आव्हान असे वाटत नव्हते; परंतु  प्रत्येक सामन्यावर लक्ष केंद्रित करून त्यात १०० टक्के योगदान देण्याचे ठरविले होते. नियोजनानुसार खेळ केला. पदकाचा विचार नव्हताच. एक-एक सामना जिंकत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या वैष्णवी भाले हिचा तीन सेटमध्ये पराभव केला आणि ऐतिहासिक सुवर्ण काबीज केले. या स्पर्धेतही दर्जेदार खेळाडू होत्या. उपांत्यपूर्व सामन्यात राशी लांबे या ज्युनियर खेळाडूविरुद्ध थोडा दबाव वाटत होता; परंतु माझा खेळ सर्वाेत्तम झाला.

ट्रेनरची भूमिका महत्त्वाची...

माझ्या यशात बºयाच व्यक्तींचा वाटा आहे. गोव्यात आल्यानंतर विनायक कामत आणि राय अतायडे यांच्यासोबत सराव करते. गोवा बॅडमिंटन संघटनेने मला खूप सहकार्य केले आहे. त्यांची खूप आभारी आहे. खेळाडंूसाठी आहार आणि फिटनेस खूप महत्त्वाचा असतो. ही जबाबदारी फोंडा येथील कृष्णनाथ नाईक हे सांभाळत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मी फिटनेसवर लक्ष देत आहे. दिवसभराचे वेळापत्रक तयार असते. कुठलीही दुखापत झाली तर मी नाईकसरांनाच कळविते.आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व खेळाडू हे फिटनेसवर अधिक भर देतात. मलाही त्याच दिशेने जावे लागेल. यासाठी ट्रेनरची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे.

एकटीचीच जगभ्रमंती...

स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण देशभर फिरले. आता जगभ्रमंती सुरू झाली आहे. लहान असताना आई किंवा वडिल सोबत असायचे; पण गेल्या दोन वर्षांपासून मी एकटीच स्पर्धेसाठी खेळायला जाते. विदेशातही बºयाचदा गेले आहे. आईवडिलांचा आशीर्वाद आणि सगळ्यांच्या शुभेच्छा यामुळे मला कुठलीच भीती वाटत नाही. संपूर्ण लक्ष स्पर्धेवरच असते. खेळात अधिकाधिक सुधारणा कशी होईल, याचा मी प्रयत्न करीत आहे, असेही अनुराने सांगितले. 

 

लेग स्ट्रेंथ, संयमावर भर...

राष्ट्रीय विजेती असलेल्या अनुराला आपल्या कमकुवत बाजूंचाही चांगला अभ्यास आहे. सायना नेहवाल या दिग्गज खेळाडूविरुद्ध खेळताना आपल्या बºयाच गोष्टी लक्षात आल्या होत्या. तिच्याविरुद्ध खेळण्याचा अनुभव अविस्मरणीय होता, असे सांगत तिने आपल्या कमकुवत बाजू शेअर केल्या. ती म्हणाली, मी जरी नंबर वनवर असले तर माझ्या फिटनेसवर अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. माझ्या पायांच्या हालचाली आणि अधिक वेळ रॅली खेळण्यासाठी लागणारा संयम यात सुधारणा व्हायला हवी. बॅडमिंटनमध्ये केवळ आक्रमकता महत्त्वाची नाही तर तितकाच संयमही लागतो. प्रतिस्पर्धी खेळाडू आक्रमक असेल तर संयमाची कसोटी लागते. 

 

अनुराची कामगिरी..

भारतीय बॅडमिंटन मानांकनात अनुरा सध्या एकेरी आणि दुहेरीत नंबर वन क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर एकेरीतील तिचे मानांकन ११५ एवढे आहे. 

अनुराने नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय वरिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत तिने सायना नेहवालविरुद्ध उत्कृष्ट खेळ केला होता. 

मॉरिशस येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक पटकावत अनुराने पहिले आंतरराष्ट्रीय पदक मिळवले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच गोमंतकीय महिला खेळाडू ठरली होती. 

Web Title: Now look at the international 'suvarna'! - Anurah Prabhudesai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.