न्यूझीलंडसाठी आज सोपी लढत

By Admin | Updated: February 17, 2015 00:44 IST2015-02-17T00:44:31+5:302015-02-17T00:44:31+5:30

विश्वकप स्पर्धेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जात असलेल्या सह-यजमान न्यूझीलंड संघाला मंगळवारी साखळी फेरीत स्कॉटलंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

New Zealand face a simple fight today | न्यूझीलंडसाठी आज सोपी लढत

न्यूझीलंडसाठी आज सोपी लढत

ड्युनेडिन : विश्वकप स्पर्धेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जात असलेल्या सह-यजमान न्यूझीलंड संघाला मंगळवारी साखळी फेरीत स्कॉटलंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सलामी लढतीत श्रीलंकेचा ९८ धावांनी पराभव करणाऱ्या न्यूझीलंड संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे, तर आठ वर्षांच्या कालावधीनंतर विश्वकप स्पर्धेत सहभागी होत असलेला स्कॉटलंड संघ या स्पर्धेत छाप सोडण्यास उत्सुक आहे. उभय संघांसाठी गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये खेळली गेलेली लढत संस्मरणीय ठरली होती. त्या लढतीत न्यूझीलंडने स्कॉटलंडविरुद्ध एका धावेने निसटता विजय मिळविला होता.
स्कॉटलंडचा कर्णधार प्रेस्टन मोमसेनने त्या लढतीच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, ‘मी अखेरच्या चेंडूवर धावबाद झाल्यामुळे आमचे विजय मिळविण्याचे स्वप्न भंगले. आम्ही सोमवारी सकाळी त्या लढतीचे व्हिडीओ फुटेज बघितले आणि त्यामुळे आमचे मनोधैर्य उंचावण्यास मदत झाली. आम्ही त्या लढतीत विजय मिळविण्यास उत्सुक होतो; पण निसटत्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.’
दुसऱ्या बाजूचा विचार करता न्यूझीलंड संघ स्कॉटलंडचे आव्हान पेलण्यास सज्ज आहे. न्यूझीलंडचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी कुठल्याही प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखण्याची चूक करणार नसल्याचे म्हटले आहे. हेसन म्हणाले, ‘या स्पर्धेत कुठल्याही संघाने प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखण्याची चूक केली तर धक्कादायक निकाल नोंदविला जाण्याची शक्यता आहे. अन्य संघांप्रमाणे आम्ही स्कॉटलंड संघाचाही आदर करतो.’
स्कॉटलंड संघ विश्वकप स्पर्धेत छाप सोडण्यास उत्सुक आहे. आयर्लंडविरुद्ध सराव सामन्यात वेगवान गोलंदाज एलस्डेयर
इव्हान्स आणि आॅफस्पिनर माजिद
हक यांनी एकूण ७ बळी घेतले
होते. याव्यतिरिक्त फॉर्मात
असलेला माजी कर्णधार कायले कोएत्जर व सलामीवीर कॅलम मॅकलॉयड यांच्याकडून स्कॉटलंड संघाला चमकदार कामगिरीची आशा आहे.
न्यूझीलंडतर्फे सलामी लढतीत रॉस टेलरचा अपवाद वगळता आघाडीच्या सर्वंच फलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. टेलरने त्या लढतीत ४९ चेंडूंना सामोरे जाताना केवळ १४ धावा केल्या होत्या. स्कॉटलंडविरुद्धच्या लढतीत न्यूझीलंडला टेलरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त ग्रँट इलियट आपली निवड सार्थ ठरविण्यास उत्सुक आहे.
स्कॉटलंड संघ तिसऱ्यांदा विश्वकप स्पर्धेत सहभागी होत आहे. यापूर्वी १९९९ व २००७ मध्ये स्कॉटलंड संघाने आठ सामने खेळले; पण त्यांना एकाही लढतीत विजय मिळविता आला नाही. न्यूझीलंड संघाची देशाच्या दक्षिण भागात खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये कामगिरी उल्लेखनीय ठरते. २०११ मध्ये क्राईस्टचर्चमध्ये खेळल्या
गेलेल्या लढतीत न्यूझीलंडला पाकिस्ताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. (वृत्तसंस्था)

न्यूझीलंड : बेंडन मॅक्युलम (कर्णधार), कोरी अ‍ॅण्डरसन, ट्रेंट बाउल्ट, ग्रांट एलिओट, मार्टिन गुप्टील, टॉम लॅथम, मिशेल मॅकक्लेनघन, नॅथन मॅक्युलम, कायल मिल्स, अ‍ॅडम मिल्ने, लुक रोंची (यष्टीरक्षक), टिम साऊथी, रॉस टेलर, डॅनिएल व्हिटोरी, केन विलियमन्सन

स्कॉटलंड : प्रेस्टन मोम्मसेन (कर्णधार), कायले कोएत्झर (उपकर्णधार), रिची बेरींग्टन, फ्रेडी कोलमन, मॅथ्यूज क्रॉस (यष्टीरक्षक), जोश डॅवेय, अलास्डेर एवान्स, हामिश गार्डीनेर, माजीद हक, मिचल लीस्क, मॅट मॅचान, कॅलूम मॅकलीओड, साफयान शरिफ, रॉब टेलर, लेन वार्डलॉ

Web Title: New Zealand face a simple fight today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.