Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 20:24 IST2024-05-15T20:23:04+5:302024-05-15T20:24:02+5:30
नीरज चोप्राने भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत भालाफेकीत बाजी मारली.

Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
Federation Cup 2024 - ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत भालाफेकीत बाजी मारली. नीरज २०१७ मध्ये शेवटचा भुवनेश्वर येथे स्पर्धेत उतरला होता आणि त्याने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ८५.२३ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले होते. आज राष्ट्रीय फेडरेशन सीनियर अॅथलेटिक्स स्पर्धेत मनू डीपी ८२.०६ मीटर भालाफेक करून तिसऱ्या फेरीपर्यंत आघाडीवर होता.
नीरज चोप्राने पहिल्या प्रयत्नात ८२ मीटर आणि तिसऱ्या प्रयत्नात ८१.२९ मीटर लांब भालाफेक केला. पॅरिस ऑलिम्पिकसाठी ८५ मीटर लांब भालाफेक पात्रता होती. नीरजने चौथ्या प्रयत्नात ८२.२७ मीटर लांब फेक करून आघाडी घेतली. नीरजने पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता आधीच निश्चित केली आहे, परंतु आज तो ९० मीटर मार्क पार करेल अशी सर्वांना आशा होती. मात्र, त्याने ८२.२७ मीटरसह सुवर्ण नावावर केले. दीपी मान ( ८२.०६ मी.) आणि उत्तम ( ७८.३९ मी.) यांनी अनुक्रमे रौप्यपदक व कांस्यपदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला भारताचा दुसरा भालाफेकपटू किशोर जेना हा ७५.४९ मीटरसह अव्वल तीन क्रमांकाच्या बाहेर राहिला.
नीरजने यापूर्वी २०२२ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती. २०१६ मध्ये नीरज हे नाव जगभरात प्रथम पोहोचले. त्याने २० वर्षांखालील जागतिक स्पर्धा ८६.४८ मीटर लांब भालाफेकून जिंकली आणि ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. त्याशिवाय डायमंड लीग ( २०२२), आशियाई स्पर्धा ( २०१८), राष्ट्रकुल स्पर्धा ( २०१८), आशियाई अजिंक्यपद ( २०१७), दक्षिण आशियाई ( २०१६) स्पर्धांमध्ये त्याने सुवर्ण कमाई केली आहे.