Paris Olympic 2024 : 'गोल्ड' हुकले पण मनं जिंकली! नीरज चोप्राने तमाम भारतीयांची का मागितली माफी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 14:55 IST2024-08-10T14:55:15+5:302024-08-10T14:55:39+5:30
नीरज चोप्राला यंदा आपल्या पदकाचा बचाव करण्यात अपयश आले.

Paris Olympic 2024 : 'गोल्ड' हुकले पण मनं जिंकली! नीरज चोप्राने तमाम भारतीयांची का मागितली माफी?
neeraj chopra match olympic 2024 : टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राला यंदा आपल्या पदकाचा बचाव करण्यात अपयश आले. मात्र, त्याने रौप्य पदक जिंकून भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली. ऑलिम्पिक २०२४ च्या भालाफेक प्रकाराच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऐतिहासिक भाला फेकून सुवर्ण पदकाच्या दिशेने वाटचाल केली होती. पण, गोल्डन बॉय नीरज चोप्रा काही चमत्कार करेल या आशेने तमाम भारतीय त्याला पाहत होते. अखेर पाकिस्तानने सुवर्ण तर भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पाकिस्तानच्या अर्शदने ऐतिहासिक कामगिरी करताना तब्बल ९२.९७ मीटर भाला फेकला. त्याने यासह ऑलिम्पिकमध्ये सर्वात दूर भाला फेकण्याचा विश्वविक्रम केला. भारताचा स्टार नीरज चोप्रा पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरला होता. पण दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८९.४५ मीटर भाला फेकत हंगामातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.
भारतात सुवर्ण न आल्याने नीरज हताश दिसला. तो म्हणाला की, मी सर्वांची माफी मागू इच्छितो, टोकियोमध्ये झाल्याप्रमाणे यावेळी ऑलिम्पिकमध्ये आमचे राष्ट्रगीत वाजले नाही. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मी ज्या पदकासाठी आलो होतो ते पदक जिंकता आले नाही. पण, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि इतर स्पर्धा आगामी काळात होणार आहे. पदक जिंकण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असेन. अंतर वाढवण्यावर मी भर देत आहे. मोठ्या व्यासपीठावर तिंरगा फडकावल्याचा नेहमीच आनंद वाटतो.
Neeraj Chopra talking about waving the Indian flag as high as possible. 🇮🇳pic.twitter.com/KMAUUgiLXu
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 10, 2024
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने आतापर्यंत पाच कांस्य आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. गुरुवारी भारताच्या खात्यात आणखी दोन पदकांची नोंद झाली. भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले, तर भालाफेकमध्ये मागील ऑलिम्पिकमधील चॅम्पियन नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घातली. याशिवाय शुक्रवारी अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली.