मुंबई महापौर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : महिंद्रा व महात्मा गांधी संघांना जेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 21:00 IST2018-03-23T21:00:58+5:302018-03-23T21:00:58+5:30
महिंद्राचा आनंद शिंदे पुरुषांत,तर शिवशक्ती संघाची रेखा सावंत महिलांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.

मुंबई महापौर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : महिंद्रा व महात्मा गांधी संघांना जेतेपद
मुंबई : मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महिंद्रा संघाने पुरुषांत, तर महात्मा गांधी संघाने महिलांत विजेतेपद मिळविले. महिंद्राचा आनंद शिंदे पुरुषांत,तर शिवशक्ती संघाची रेखा सावंत महिलांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.
मध्यांतराला महाराष्ट्र पोलीस संघाकडे ११-१०अशी आघाडी होती. 11-10 असा खेळ जवळपास काही मिनिटे सुरू होता. यानंतर महिंद्राने अजिंक्य पवारला खेविण्याची चाल खेळली. त्याने आपल्या एकाच चढाईत ३गडी टिपत पोलिसांवर पहिला लोण देण्यात मोलाचा वाटा उचलला. सामना संपायला सहा-सात मिनिटे असताना महिंद्राने महाराष्ट्र पोलिसांवर लोण देत २४-१७अशी आघाडी घेतली. येथेच पोलिसांच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. अजिंक्य पवार, ओमकार जाधव, सुहास वगरे या विजयाचे शिल्पकार ठरले.
महिलांच्या अंतिम सामन्यात उपनगरच्या महात्मा गांधी संघाने गतविजेत्या शिवशक्ती संघाचा ३१-१९ असा सहज पराभव करीत महापौर करंडकावर आपले नाव कोरले. महात्मा गांधी संघाने सुरुवातच एवढी आक्रमक केली की, आठव्या मिनिटाला शिवशक्तीवर लोण देत ९-१अशी आघाडी घेतली. त्यानंतर शिवशक्तीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मध्यांतराला महात्मा गांधी संघाकडे १४-०९ अशी आघाडी होती. हा फरक शेवटच्या पाच मिनिटापर्यंत कायम होता. शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना शिवक्तीला विजयाची नामी संधी मिळाली होती.त्या वेळी महात्मा गांधी संघात पूजा किणी होती. त्यावेळी पूजाने चढाईत बोनस गुणासह एक गडी टिपत संघाच्या विजयाच्या आशा शिल्लक ठेवल्या. रक्षा आणि रेखा यांच्या मोक्याच्या क्षणी झालेल्या पकडी शिवशक्तीला पराभवाच्या गर्तेत घेऊन गेल्या. पूजा किणी, सृष्टी चाळके, प्रतीक्षा मांडवकर,तेजस्वीनी पाटेकर या विजयाच्या शिल्पकार ठरल्या.