'Mr. Asia' sunit jadhav wants to get a job government, but not get chance yet | 'मिस्टर एशिया'त झेंडा फडकवणाऱ्या महाराष्ट्रपुत्राला हवीय नोकरी; सरकार दरबारी खेटे घालून थकला!

'मिस्टर एशिया'त झेंडा फडकवणाऱ्या महाराष्ट्रपुत्राला हवीय नोकरी; सरकार दरबारी खेटे घालून थकला!

ठळक मुद्देसुनीतने आशियाई स्पर्धेत जेतेपद पटकावले. त्याचे बरेच सत्कार झाले, पण सरकारला त्याचे सोयर-सुतकही नाही. खेळाडूंसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे म्हणणाऱ्या क्रीडा मंत्र्यांच्या गावीही सुनीतचा हा भीमपराक्रम नसावा, ही खेदजनक बाब आहे.

मुंबई : देशासाठी सर्वस्व विसरावं. सर्वोत्तम कामगिरी करून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकाला गवसणी घालावी. तिरंगा डौलानं फडकताना पाहावा. राष्ट्रगीताची धुन ऐकताना अभिमानाने उर भरून यावा. देशाचं नाव अभिमानाने आपल्यामुळे उंच व्हावं, अशी प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. जसा एखादा खेळाडू देशासाठी सारं काही अर्पण करतो. त्यामुळे देशानेही आपल्याला पाठिंबा द्यावा, पदकाच्या मार्गातील अडचणी दूर कराव्यात, अशी अपेक्षा जर खेळाडू बाळगत असेल, तर त्यात गैर काहीच नसावे. पण सध्याच्या घडीला तब्बल 23 वर्षांनी भारताला मिस्टर आशिया हा किताब जिंकवून देणारा शरीरसौष्ठवपटू मात्र शासकीय नोकरीसाठी जोडे झिजवून थकला आहे. भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकवून देणारा सुनीत जाधव अजूनही सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत आहे. 

हा पाहा सुनीत जाधवची खास मुलाखत

सुनीतने आशियाई स्पर्धेत जेतेपद पटकावले. त्याचे बरेच सत्कार झाले, पण सरकारला त्याचे सोयर-सुतकही नाही. खेळाडूंसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे म्हणणाऱ्या क्रीडा मंत्र्यांच्या गावीही सुनीतचा हा भीमपराक्रम नसावा, ही खेदजनक बाब आहे. एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय पदक पटकावले की त्याचा लगेच शासनातर्फे सत्कार केला जातो. पण जेतेपद जिंकून दोन आठवडे होत आले तरी सुनीतच्या नशिबी सरकारी सत्कार अजूनही नाही.

या साऱ्या प्रकाराबद्दल सुनीत म्हणाला की, " माझ्यासारख्या खेळाडूंनी सरकारकडून प्रोत्साहनाची अपेक्षा करणे गैर नक्कीच नाही. मी जेव्हा दोनदा राष्ट्रीय स्पर्धा जिंकलो होतो. तेव्हा मी सरकारी नोकरीसाठी अर्ज केला होता. पण त्यावेळी असा पराक्रम करणारे बरेच जण आहेत, असे मला सांगण्यात आले. आता तर मी भारताला तब्बल 23 वर्षांनी आशियाई सुवर्णपदक जिंकवून दिले आहे. त्यामुळे आतातरी मला शासकीय नोकरी मिळाली, अशी साधारणा अपेक्षा जर मी ठेवत असेन तर त्यामध्ये गैर काहीच नाही. " 

सुनीत हा सर्वसामान्य कुटुंबातला. मुंबईत स्वत:चे घर नाही. दादरला एका लहानशी खोली त्याने भाडेतत्वावर घेतली आहे. त्याचबरोबर शरीरसौष्ठव हा खेळही महागडा आहे. महिन्याला 30-40 हजार रुपये शरीरावर खर्च करावे लागतात. आता आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यावर सुनीतसारख्या गरजू खेळाडूला सरकार मदत करत नसेल, तर त्याने कुणाकडे पाहायचे? हा यक्षप्रश्न आहे.

" हरयाणामधून बरेच खेळाडू घडताना दिसतात. त्यांना पदकही मिळतात, या साऱ्या गोष्टीचे कारण त्यांना सरकारने दिलेल्या सुविधा आहेत. खेळाडूंना जर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नसेल तर त्याची कामगिरी नेत्रदीपक होते. महाराष्ट्र सरकारही खेळाडूंसाठी बरेच काही करत आहे. त्यामुळेच क्रीडा खात्याकडून मला नोकरीची अपेक्षा आहे," असे सुनीत सांगत होता.

Web Title: 'Mr. Asia' sunit jadhav wants to get a job government, but not get chance yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.