महापौर बुध्दिबळ : ग्रँड मास्टर फारुख ठरला विजेता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 11:12 PM2019-06-18T23:12:30+5:302019-06-18T23:12:48+5:30

टायब्रेकरमध्ये फारूखने बाजी मारली व मुंबई महापौर चषकावर सलग दुसऱ्यांदा आपले नाव कोरले.

Mayor Prudhibhal: Grand Master Farooq became the winner | महापौर बुध्दिबळ : ग्रँड मास्टर फारुख ठरला विजेता

महापौर बुध्दिबळ : ग्रँड मास्टर फारुख ठरला विजेता

Next

मुंबई : द्वितीय मानांकित ताजिकिस्तानचा ग्रँडमास्टर अमोनातोव फारूखने (इलो २६२४) मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय अ विभाग बुद्धिबळ स्पर्धा जिंकली.मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना व व्हिनस चेस अकादमी आयोजित स्पर्धेमधील निर्णायक दहाव्या फेरी अखेर ताजिकिस्तानचा फारुख अमोनातोव व दहावा मानांकित आर्मेनियाचा ग्रँड मास्टर पेट्रोस्यांन मॅनुएल (इलो २५७३) यांचे प्रत्येकी ८ गुण झाले. परंतु सरस टायब्रेकरमध्ये फारूखने बाजी मारली व मुंबई महापौर चषकावर सलग दुसऱ्यांदा आपले नाव कोरले.  परदेशी ग्रँडमास्टरांच्या मक्तेदारीत टॉप-१० पुरस्कारांमध्ये २५ वा मानांकित तामिळनाडूचा ग्रँडमास्टर आर.आर. लक्ष्मणने ७.५ गुणांसह (इलो २४३७) दहाव्या क्रमांकाच्या पुरस्कारावर भारतातर्फे मोहोर उमटवली. 

   बृहन्मुंबई महानगरपालिका पुरस्कृत माउंट लिटेरा स्कुल इंटरनॅशनल संस्थेच्या सहकार्याने बीकेसी येथे झालेल्या अ विभाग बुध्दिबळ स्पर्धेमधील पहिल्या पटावर पेट्रोस्यांन मॅनुएल विरुद्ध बारावा मानांकित जॉर्जियाचा ग्रँड मास्टर पैचाड्झे लका (इलो २५५७) यांच्यातील डाव कॅटलान ओपनिंग पद्धतीने सुरू झाला. विजेतेपदासाठी विजय आवश्यक असल्याने मॅन्युएलने एका प्याद्याचा बळी देऊन प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु लुकाने भक्कम बचाव केला. बऱ्याच मोहऱ्यांची अदलाबदली झाल्यानंतर शेवटी ५८ चालीत दोन्ही खेळाडूंनी डाव बरोबरीत सोडविण्याचे मान्य केले. पेट्रोस्यांन मॅनुएलने निर्णायक डावात विजय मिळविण्यासाठी रचलेल्या विविध चालींचे डावपेच थक्क करणारे ठरले.

दुसऱ्या पटावर अठरावा मानांकित चिलीचा ग्रँड मास्टर रॉड्रिगो वास्केझच्या (इलो २४७६)  सिसिलियन ड्रॅगन बचावाला प्रत्युत्तर देताना गतविजेत्याफारुख अमोनातोवने युगोस्लाव अटॅक पद्धतीचा अवलंब केला. विजय मिळवायचाच या जिद्दीने खेळणाऱ्या फारूखने कॅसलिंग न करताच रॉड्रिगोच्या राजावर आक्रमण सुरू केले. बचाव व प्रतिहल्ल्याचा ताळमेळ साधताना रॉड्रिगोने काही चुका केल्या. त्याचा पुरेपूर फायदा उठवत फारूखने ४९ चालीत विजयावर शिक्कामोर्तब केले आणि अखेर स्पर्धेचे अजिंक्यपद देखील राखले.

ग्रँड मास्टर सॅमवेल तेर-सहक्यानने (इलो २६११) चौथा क्रमांक, तेरावा मानांकित ब्राझिलचा ग्रँड मास्टर अलेक्झांडर फियरने (इलो २५४३) पाचवा क्रमांक, नववा मानांकित रशियाचाग्रँड मास्टर तुरोव्ह मॅक्झीमने (इलो २५७९) सहावा क्रमांक, चौदावा मानांकित युक्रेनचा ग्रँड मास्टर तुखाईव अॅडमने (इलो २५२७) सातवा क्रमांक, बारावा मानांकित जॉर्जियाचा ग्रँड मास्टर पैचाड्झे  लकाने (इलो २५५७) आठवा क्रमांक, सतरावा मानांकित बांगलादेशचा ग्रँड मास्टर रेहमान झिऔरने (इलो २४८१) नववा क्रमांक तर पंचवीसावा मानांकित भारताचा ग्रँडमास्टर आर.आर. लक्ष्मणने (इलो २४३७) दहावा क्रमांक पटकाविला.

Web Title: Mayor Prudhibhal: Grand Master Farooq became the winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.