पदकतालिकेत यजमान महाराष्ट्राचे वर्चस्व; अ‍ॅथलेटिक्स, जलतरणामध्ये सुवर्ण यश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 08:46 AM2019-01-11T08:46:01+5:302019-01-11T08:46:40+5:30

खेलो इंडिया यूथ गेम्स, सौरभची चमक

Maharashtra's dominance in the title; Athletics, Golden Yoga in Swimming | पदकतालिकेत यजमान महाराष्ट्राचे वर्चस्व; अ‍ॅथलेटिक्स, जलतरणामध्ये सुवर्ण यश

पदकतालिकेत यजमान महाराष्ट्राचे वर्चस्व; अ‍ॅथलेटिक्स, जलतरणामध्ये सुवर्ण यश

Next

पुणे : महाराष्ट्राच्या सौरभ रावत याने १५०० मीटर शर्यतीमध्ये महाराष्ट्राचा पताका फडकाविताना सुवर्ण पदकावर कब्जा केला. त्याचप्रमाणे, उंच उडीत १७ वर्षांखालील गटात धौर्यशील गायकवाड याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. गुरुवारी दिवसभरात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. या जोरावर यजमान महाराष्ट्राने पदकतालिकेत वर्चस्व राखताना सर्वाधिक १४ सुवर्णपदकांसह अव्वल स्थान पटकावले.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने पदकतालिकेत आघाडी घेतली असली, तरी दिल्ली संघाकडून यजमानांना कडवी स्पर्धा मिळत आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत १४ सुवर्ण पदकांसह एकूण ४४ पदकांची लयलूट केली असून दिल्लीच्या खात्यात १३ सुवर्ण पदकांसह ३१ पदकांची नोंद आहे. १७ वर्षांखालील १५००मीटर धावण्याच्या शर्यतीत सौरभने सुरुवातीपासून राखलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखत ४ मिनिटे २२.१५ सेकंदात बाजी मारली. त्याच्या धडाक्यापुढे तामिळनाडूच्या बी. माथेश (४:२२.२२) आणि हरियाणाच्या अजयकुमार (४:२३.५६) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे १७ वर्षांखालील उंच उडी स्पर्धेत महाराष्ट्राच्या धैर्यशील आणि पंजाबच्या रॉबिनदीप सिंग यांनी प्रत्येकी १.९८ मीटरची उडी घेतली. मात्र, रॉबिनदीप याने कमी वेळेत ही उडी घेतल्याने त्याला सुवर्ण पदकाचा मान मिळाला. महाराष्ट्राच्याच दत्ता याने १.९२ मीटरची उडी घेत कांस्य पदकावर नाव कोरले.

जलतरणामध्ये ‘सुवर्ण’ सूर

करीना शांक्ता, शेरॉन शाजू आणि मिहिर आंब्रे या जलतरणपटूंनी महाराष्ट्राला सुवर्ण यश मिळवून दिले. त्याचप्रमाणे, ज्योती पाटील, ॠतुजा तळेगावकर यांनी रौप्य, तर साध्वी धुरी हिने एक रौप्य व एक कांस्य पटकावले.
मुलींच्या १७ वर्षांखालील गटात करीनाने १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात एक मिनिट १६.८२ सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्ण पटकावले. २१ वर्षांखालील गटात शेरॉनने १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये एक मिनिट १६.८६ सेकंदासह सुवर्ण जिंकले. याच शर्यतीत ज्योतीला रौप्यवर समाधान मानावे लागले.

नगरच्या भाग्यश्रीने पटकावले रौप्य
अहमदनगर : मागील वर्षी ‘खेलो इंडिया’त महाराष्ट्रासाठी सुवर्ण पदक मिळवून देणारी पहिली महिला कुस्तीगीर म्हणून नावलौकिक पटकावलेल्या भाग्यश्री फंड हिला यंदा रौप्य पदकावर समाधान मानावे लागले़ भाग्यश्रीला हरियाणाच्या मंजु हिने मोळी डावावर मात दिली़
५७ किलो वजन गटात श्रीगोंद्याची भाग्यश्री हनुमंत फंड हिने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली़ अंतिम फेरीत भाग्यश्रीने सुरुवातीला सहा गुणांची कमाई करीत आघाडी घेतली होती़ परंतु नंतर मंजुने भाग्यश्रीवर मोळी डाव टाकून विजय मिळविला़ जपानमधे झालेल्या आशियाई सब ज्युनिअर कुस्ती स्पर्धेतही भाग्यश्रीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर तिला सराव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता़

पुण्यात झालेला पराभव बरेच काही शिकवणारा आहे़ या पराभवाने खचून न जाता अधिक सराव करून पुन्हा जिंकण्यासाठीच मैदानात उतरणार आहे़
- भाग्यश्री फंड

Web Title: Maharashtra's dominance in the title; Athletics, Golden Yoga in Swimming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.