Maharashtra Kesari 2025 : 'पंचांचा निर्णय अंतिम असतो, मारहाण झाली हे चुकीचं'; राक्षेवर केलेल्या कारवाईवर पृथ्वीराज मोहोळने थेटच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 13:54 IST2025-02-03T13:53:16+5:302025-02-03T13:54:02+5:30
Maharashtra Kesari 2025 : महाराष्ट्र केसरी २०२५ स्पर्धा काल अहिल्यानगरमध्ये पार पडल्या. यावर्षीचा महाराष्ट्र केसरीचा मानकरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ ठरला.

Maharashtra Kesari 2025 : 'पंचांचा निर्णय अंतिम असतो, मारहाण झाली हे चुकीचं'; राक्षेवर केलेल्या कारवाईवर पृथ्वीराज मोहोळने थेटच सांगितले
Maharashtra Kesari 2025 ( Marathi News ) : या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगरमध्ये पार पडल्या. पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपले नाव कोरले. शेवटच्या १६ सेकंदात महेंद्र गायकवाड याने मैदान सोडले यामुळे पै. पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित करण्यात आले. दरम्यान, आज महाराष्ट्र केसरी विजेता पै. पृथ्वीराज मोहोळ याने पुण्यातील त्याच्या तालमीला भेट दिली. यावेळी त्याने माध्यमांसोबत संवाद साधला. दरम्यान, त्याने पैलवान शिवराज राक्षे याने केलेली मारहाण चुकीचे असल्याचे सांगितले. तसेच पंचांचा निर्णय हा अंतिम असतो, असंही सांगितले.
माध्यमांसोबत बोलताना पृथ्वीराज मोहोळ म्हणाला, माझी चुलत्यांनी आणि वडीलांनी तयारी केली होती. या तयारीमुळे मी आज जिंकलो आहे. आज आमच्या तालुक्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. काल दिलेला निर्णय हा पंचांनी दिला आहे. हा त्यांचा निर्णय आहे. मी माझं काम केलं आहे. जे घडलं ते चुकीचं घडलं आहे, मारहाण व्हायला नको होती, असंही पैलवान पृथ्वीराज मोहोळ म्हणाला.
"सगळ्यांसाठी पंचांचा निर्णय अंतिम असतो. मागच्या वर्षी माझ्यासोबत असंच झालेलं होतं. मी पुन्हा तयारी केली आणि या वर्षी जिंकलो. गेल्या वेळी माझ्यावर अन्याय झाला होता. खेळाडूवर अन्याय होत असतो, असंही पृथ्वीराज मोहोळ म्हणाला.
पैलवान शिवराज राक्षे याने पंचांना लाथ मारली
काल झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मॅटवरील सेमी फायनल सामना पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाला. पण. या डावात शेवटच्या क्षणी पंचांनी मोहोळ याला विजयी घोषित केले. पण, यावेळी पै.शिवराज राक्षे याची पाठ पूर्ण टेकली नसल्याचा दावा राक्षे याने केला. पण पंचांनी हा दावा फेटाळून लावला. शिवराज राक्षे याने रिप्लाय दाखवण्याची मागणी केली. पण, तीही मागणी फेटाळून लावली. यावेळी पै.शिवराज राक्षे आणि पंचांमध्ये मोठा वाद सुरू झाला. दरम्यान, शिवराज राक्षे याने पंचांना लाथ मारल्याचे समोर आले आहे. यामुळे राक्षे आला तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.