नवी दिल्ली : आयपीएलमध्ये कामगिरीत नेहमी पिछाडीवर राहणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबने यंदा आघाडीवर राहण्याचा निर्धार केला असून, आॅस्टे्रलियाचा धडाकेबाज अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याच्याकडे संघाची धुरा सोपविण्यात आली आहे. गेल्या दोन्ही मोसमामध्ये पंजाब संघ गुणतक्त्यात तळाच्या स्थानी राहिला होता. त्यामुळेच यंदाच्या मोसमात संघाला आघाडीवर आणण्याचे मोठे आव्हान मॅक्सवेलपुढे असेल. विशेष म्हणजे २०१४ सालची कामगिरी सोडल्यास पंजाब संघाला आयपीएलमध्ये आपली छाप पाडण्यात अपयश आले आहे. त्यावेळी मॅक्सवेलने निर्णायक भूमिका बजावताना संघाला अंतिम सामन्यात नेले होते. कदाचित यामुळेच भारताचा कसोटी सलामीवीर मुरली विजय याच्याकडून संघाचे कर्णधारपद मॅक्सवेलकडे सोपविण्यात आले असावे, अशी चर्चाही रंगत आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वीच रायजिंग पुणे सुपरजायंट्स संघानेही स्टार कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडील नेतृत्व काढले आणि आॅस्टे्रलियाच्या स्टिव्ह स्मिथकडे संघाची धुरा सोपविली. त्यामुळे धोनीनंतर कर्णधारपद काढून घेण्यात आलेला विजय दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याचवेळी, भारतीय क्रिकेटपटूऐवजी आॅस्टे्रलियन खेळाडूवर विश्वास दाखवणारा पंजाब संघ पुणे संघानंतर दुसरा संघ ठरला आहे. त्यामुळे, आगामी ५ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या १०व्या सत्रात पुणे आणि पंजाब यांची कामगिरी कशी होते, याकडे क्रिकेटप्रेमींचे विशेष लक्ष असेल.मागच्याच सत्रामध्ये पंजाबने दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हीड मिलरची कर्णधारपदावर उचलबांगडी करताना मुरली विजयकडे नेतृत्त्व सोपविले होते. (वृत्तसंस्था)
किंग्ज इलेव्हन पंजाबची धुरा ग्रेन मॅक्सवेलकडे
By admin | Updated: March 11, 2017 01:58 IST