Khelo India: Maharashtra in semi-finals in all four groups in Kho-Kho | खेलो इंडिया : खो-खो मध्ये महाराष्ट्र चारही गटात उपांत्य फेरीत

खेलो इंडिया : खो-खो मध्ये महाराष्ट्र चारही गटात उपांत्य फेरीत

गुवाहटी : खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे खो-खो मध्ये विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल करताना चारही गटात उपांत्य फेरी गाठली. मुलींच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने गुजरातचा १०-६ असा एक डाव ४ गुणांनी पराभव केला.
    मुलांमध्ये महाराष्ट्राने कर्नाटकवर १०-४ अशी एक डाव ६ गुणांनी मात केली. मुलांच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने आंध्रप्रदेशचा १३-१२ असा तीन मिनिटे राखून पराभव केला. मुलींमध्ये महाराष्ट्राने आंध्रप्रदेशला ११-६ असे एक डाव ६ गुणांनी पराभूत केले.

*टेनिसमध्ये सई व आकांक्षाचा एकतर्फी विजय
    महाराष्ट्राच्या सई भोयार व आकांक्षा निठुरे यांनी टेनिसमधील मुलांच्या एकेरीत धडाकेबाज प्रारंभ केला. १७ वर्षाखालील गटात भोयारने तामिळनाडूच्या कार्तिका विजय हिला ३-६, ६-१, ६-० असे पराभूत केले. आकांक्षाने दिल्लीच्या काव्या खिरवारचा ६-२, ६-० असा दणदणीत पराभव केला. मुलांच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या संदेश कुरळे याने पुडुचेरीच्या शिव विष्णु याचा ६-०, ६-० असा धुव्वा उडविला.

*बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा पुन्हा पराभव
    महाराष्ट्राला बास्केटबॉलमधील १७ वर्षाखालील मुलींमध्ये पुन्हा पराभव स्वीकारावा लागला. त्यांना तामिळनाडूने ७५-६८ असे हरविले. मध्यंतराला तामिळनाडूने ३२-३१ अशी आघाडी घेतली होती. त्यांच्याकडून सत्याकुमारीने ३० गुण तर निकिताने १४ गुण नोंदविले. महाराष्ट्राकडून शोमिरा बिडाये, तन्वी साळवे व सिया देवधर यांची लढत अपुरी ठरली. पहिल्या सामन्यात महाराष्ट्राला राजस्तानकडून हार मानावी लागली होती.

Web Title: Khelo India: Maharashtra in semi-finals in all four groups in Kho-Kho

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.