अभिमानास्पद! १४ वर्षीय जयसिंगने उंचावली भारताची मान; आंतरराष्ट्रीय घोडेस्वारीत पटकावलं रौप्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 19:29 IST2024-07-31T13:55:37+5:302024-07-31T19:29:52+5:30
Jai Singh Sabharwal, India Silver Medal: ४० देशांमधून आलेल्या एकूण ६३ घोडेस्वारांच्या शर्यतीत भारताच्या जय सिंग सभरवालने पटकावला दुसरा क्रमांक

अभिमानास्पद! १४ वर्षीय जयसिंगने उंचावली भारताची मान; आंतरराष्ट्रीय घोडेस्वारीत पटकावलं रौप्यपदक
Jai Singh Sabharwal, silver medal in equestrian: युरोपमधील बेल्जियम येथे नुकत्याच पार पडलेल्या घोडेस्वारीच्या शर्यतीत भारताच्या १४ वर्षांच्या मुलाने कमाल केली. CSI 1 ( Concours de Saut International ) - 1.20m आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताच्या जय सिंग सभरवाल याने दुसरा क्रमांक मिळवत रौप्यपदक पटकावले. २५ ते २८ जुलै २०२४ या कालावधीत बेल्जियममध्ये ही स्पर्धा रंगली होती. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ४० देशांमधून एकूण ६३ घोडेस्वारांनी सहभाग घेतला होता. या ६३ घोडेस्वारांमध्ये भारताच्या जय सिंग सभरवाल याने दुसरा क्रमांक मिळवत भारताची मान उंचावली.
जय सिंग सभरवालचा आतापर्यंत प्रवास
जय सिंग सभरवाल हा भारताचा एक उदयोन्मुख घोडेस्वार आहे. जय सिंगला घोडेस्वारीचे लहानपासूनच आकर्षण होते. त्यामुळे वयाच्या पाचव्या वर्षापासूनच जय सिंगने घोडेस्वारीचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. आपल्या फार्म हाऊसमधील मोकळ्या जागेत त्याने घोडेस्वारीचे धडे गिरवायला प्रारंभ केला. तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत त्याने घोडेस्वारीतच आपले करिअर घडवण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून त्याने अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि यश मिळवले. शर्यतीत आणि स्पर्धांमधील जास्तीत जास्त सहभागातून खूप शिकायला मिळते, असे तो नेहमी सांगतो.
१२व्या वर्षापासून भारताचे प्रतिनिधित्व
वयाच्या पाचव्या वर्षापासून घोडेस्वारीचे शिक्षण घेणाऱ्या जय सिंग सभरवालने १२व्या वर्षी आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा गाठला आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करू लागला. तेव्हापासून अवघ्या २ वर्षात त्याने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला असून विविध स्तरावर यश प्राप्त केले आहे.