आयर्लंडचा विंडीजला धक्का

By Admin | Updated: February 17, 2015 00:38 IST2015-02-17T00:38:05+5:302015-02-17T00:38:05+5:30

जायंट किलर आयर्लंडने सोमवारी खेळल्या गेलेल्या लढतीत वेस्ट इंडिजचा ४ गडी राखून पराभव केला आणि आयसीसी विश्वकप स्पर्धेत धक्कादायक निकालाची नोंद केली.

Ireland's Windies push | आयर्लंडचा विंडीजला धक्का

आयर्लंडचा विंडीजला धक्का

लेंडल सिमन्सची खेळी व्यर्थ : पॉल स्टर्लिंग, एड जॉयस, नील ओब्रायनची अर्धशतके
नेल्सन : पॉल स्टर्लिंग (९२), एड जॉयस (८४) व नील ओब्रायन (७९) यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीच्या जोरावर जायंट किलर आयर्लंडने सोमवारी खेळल्या गेलेल्या लढतीत वेस्ट इंडिजचा ४ गडी राखून पराभव केला आणि आयसीसी विश्वकप स्पर्धेत धक्कादायक निकालाची नोंद केली.
गेल्या दोन विश्वकप स्पर्धेत पाकिस्तान व इंग्लंड यांच्यासारख्या अव्वल संघांना पराभवाचा तडाखा देणाऱ्या आयर्लंडने या वेळीही धक्कादायक निकाल नोंदविण्याची परंपरा कायम राखली. वेस्ट इंडिजने दिलेले ३०५ धावांचे लक्ष्य आयर्लंडने ४५.५ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. विंडीजतर्फे वेगवान गोलंदाज जेरोम टेलरने ७१ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले.
त्याआधी, वेस्ट इंडिजने निराशाजनक सुरुवातीनंतर लेंडल सिमन्स (१०२) व डॅरेन सॅमी (८९) यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर ७ बाद ३०४ धावांची मजल मारली. सिमन्स व सॅमी यांनी सहाव्या विकेटसाठी १५४ धावांची भागीदारी केली. विश्वकप स्पर्धेत सहाव्या विकेटसाठी ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. विंडीजचे क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचे होते. त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी किमान चार झेल सोडले. अर्धशतकी खेळी करणाऱ्या जॉयसला वैयक्तिक ४२ धावांवर असताना जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर डॅरेन ब्राव्होने जीवदान दिले, तर नील ओब्रायनला २८ व ३८ धावांवर जीवदान मिळाले. सलामीवीर विलियम पोर्टरफिल्डचा (२३) स्वत:च्या चेंडूवर उडालेला झेल आंद्रे रसेलला टिपण्यात अपयश आले.
आयर्लंडला अखेरच्या १० षटकांत विजयासाठी २२ धावांची गरज होती. त्यानंतर अ‍ॅण्डी बिलबिर्नी (०९), गॅरी विल्सन (०१) आणि केव्हिन ओब्रायन (००) एकापाठोपाठ बाद झाले. नील ओब्रायनने संघाला विजयी लक्ष्य गाठून दिले. नील ओब्रायनने ६० चेंडूंच्या खेळीमध्ये ११ चौकार ठोकले.
त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या वेस्ट इंडिजची एकवेळ ५ बाद ८७ अशी अवस्था झाली होती, पण त्यानंतर सिमन्स व सॅमी यांनी डाव सावरला. ड्वेन स्मिथ (१८), ब्राव्हो (०), ख्रिस गेल (३६ धावा, ६५ चेंडू, ३ चौकार, १ षटकार) यांना मोठी खेळी करता आली नाही. दिनेश रामदिन (१) यालाही छाप सोडता आली नाही.
त्यानंतर सिमन्स व सॅमी यांनी संयमी फलंदाजी करीत डाव सावरला. सॅमीने कारकिर्दीतील नववे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या ६७ धावांच्या खेळीत ९ चौकार व ४ षटकारांचा समावेश आहे. सिमन्सने ८४ चेंडूंना सामोरे जाताना कारकिर्दीतील दुसरे शतक झळकाविले. त्यात ९ चौकार व ५ षटकारांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)

नंबर गेम...
८९ सातव्या क्रमांकावर फलंदांजीस येऊन ८९ धावांची खेळी करून विंडीजच्या डॅरेन सॅमीने नवीन विक्रम प्रस्थापित केला. पूर्वीचा ७७ धावांचा विक्रम पाकिस्तानच्या शाहिद मेहबूबच्या नावावर होता.

१९८विंडीज संघाने शेवटच्या २० षटकांत १९८ धावा केल्या. २००१ नंतर केलेली ही दुसरी मोठी धावसंख्या आहे.

१५४ सहाव्या विकेटसाठी सॅमी व सिमन्सने १५४ धावांची केलेली ही भागीदारी विश्वचषक स्पर्धेतील तिसरी मोठी भागीदारी आहे. २०११ मध्ये आयर्लंडच्या ओ ब्रॅन व अ‍ॅलेक्सने १६२ धावांची भागीदारी केली होती.

०३ तीन वेळा आयर्लंड संघाने ३०० पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची ही तिसरी वेळ आहे.

०४ आयर्लंड संघाने विश्वचषक स्पर्धेत कसोटी राष्ट्रीय संघाचा पराभव करण्याची चौथी वेळ आहे. प्रथम २००७ मध्ये पाकिस्तान व बांगलादेश, २०११मध्ये इंग्लंड व आता विंडीज.

०१सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन विंडीजचा सिमन्स शतकी खेळी करणारा पहिला फलंदाज ठरला. १९७९ च्या अंतिम लढतीत विंडीजच्या किंग्जने ८६ धावा केल्या होत्या.

७१विश्वचषक स्पर्धेत आघाडीच्या आठ संघांपैकी एकाविरुद्ध आघाडीला फलंदाजीस येऊन ७१ धावांची भागीदारी करण्याचा विक्रम आयर्लंडच्या विलियम्स व स्टरलिंग यांनी केला आहे.

वेस्ट इंडिज : ड्वेन ब्राव्हो झे. मुनी गो. केव्हिन १८, ख्रिस गेल झे. केव्हिन गो. डाकरेल ३६, डॅरेन ब्राव्हो धावबाद ००, मार्लन सॅम्युअल्स पायचित गो. डाकरेल २१, दिनेश रामदिन पायचित गो. डाकरेल ०१, लेंडल सिमन्स झे. डाकरेल गो. सोरेन्सन १०२, डॅरेन सॅमी झे. डाकरेल गो. मुनी ८९, आंद्रे रसेल नाबाद २७, जेसन होल्डर नाबाद ००. अवांतर (१०). एकूण ५० षटकांत ७ बाद ३०४. गोलंदाजी : मुनी ७-१-५९-१, सोरेन्सन ८-०-६४-१, मॅकब्रायन १०-१-२६-०, केव्हिन ९-०-७१-१, डाकरेल १०-०-५०-३, स्टर्लिंग ६-०-३३-०.

आयर्लंड : विलियम्स पोर्टरफिल्ड झे. रामदिन गो. गेल २३, पॉल स्टर्लिंग झे. रामदिन गो. सॅम्युअल्स ९२, एड जॉयस झे. ब्राव्हो गो. टेलर ८४, नील ओब्रायन नाबाद ७९, अ‍ॅण्डी बेलाबिर्नी झे. ब्राव्हो गो. टेलर ०९, गॅरी विल्सन झे. गेल गो. टेलर १, केव्हिन ओब्रायन धावबाद ००, जॉन मुनी नाबाद ०६. अवांतर (१३). एकूण ४५.५ षटकांत ६ बाद ३०७. गोलंदाजी : होल्डर ९-१-४४-०, रोच ६-०-५२-०, टेलर ८.५-०-७१-३, रसेल ६-०-३३-०, गेल ८-०-४१-१, सॅमी ३-०-२५-०, सॅम्युअल्स ४-०-२५-१, सिमन्स १-०-१२-०.

Web Title: Ireland's Windies push

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.