International Carrom: Prashant More, all Indians in semifinal with Apurva! | आंतरराष्ट्रीय कॅरम : प्रशांत मोरे, अपूर्वासह उपांत्य  फेरीत सारेच भारतीय !
आंतरराष्ट्रीय कॅरम : प्रशांत मोरे, अपूर्वासह उपांत्य  फेरीत सारेच भारतीय !

ठळक मुद्देप्रशांत मोरे, झहीर पाशा आणि राजेश गोहिल हे अन्य भारतीयही उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत.

पुणे : इर्शाद अहमद या नागपूर करांने श्रीलंकेचा माजी जगज्जेता निशांत फर्नांडोला एका तीन सेट रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत पराभूत करून ८ व्या आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन चषक स्पर्धेमध्ये मोठी खळबळ उडवून दिली. त्यामुळे पी. वाय. सी. जिमखान्याच्या वातानुकुलित सभागृहामधील वातावरण चक्क गरम झाले. पहिल्या सेटमध्ये ७-२५ असा सपाटून मार खाणार्‍या इर्शादने मग पुढचे सेट २५-१२, २५-७  असे जिंकून पुरुष विभागाचे विजेते पद भारतातच राहणार याची खात्री केली.

महिलांमध्ये हे अजिंक्यपद भारतच जिंकणार हेही नक्की झाले विश्‍वविजेती अपूर्वा, गतविश्‍वविजेती आणि दहा वेळीची राष्ट्रीय विजेती रश्मी कुमारी आणि आयेशा साजिद व के नागज्योती यांनी उपांत्य फेरीत धडक मारली. प्रशांत मोरे, झहीर पाशा आणि राजेश गोहिल हे अन्य भारतीयही उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत.विश्‍वविजेत्या प्रशांत मोरेने बांगलादेशच्या मोहम्मद हिमायतचा २५-८, २५-२० असा पराभव केला. त्याने त्याआधीच्या फेरीत कॅनडाचा लुईस फर्नांडिस, या माजी फुटबॉल पटू असणार्‍या मुंबईकराचा २५-१२, २५-७ असा सहज पाडाव केला होता. प्रशांतची गाठ आता राजेश गोहिलशी पडेल. सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असणार्‍या झहीर अहमदने श्रीलंकेच्या शाहिद इल्मीला २५-१५, २५-१० असे लोळविले. झहिरने या लढती दरम्यान स्पर्धेमधील त्याच्या ७ व्या ब्रेक टू-फीनिशची नोंद केली. या दोन दिग्गज खेळाडूंच्या मानाने राजेश गोहिलचा मालदिवसच्या ईस्माइल अझमिनवरिल २५-५, २५-५  हा विजेय फारच सोपा वाटला.
एकीकडे तिच्या अन्य दिग्गज सहकारी सहज विजयांची नोंद करत असता आयेशा साजिदला चांगलाच संघर्ष करावा लागला. तिने अखेर श्रीलंकेच्या रेबेका डॅलरिनला २५-२४, २५-२४ असे चकविले. पण यापेक्षा आश्‍चर्य चकित वाटण्यासारखी घटना होती रश्मी कुमारीच्या विजयाची तिने रोशिता जोसेफला पहिल्या सेटमध्ये साधे खातेही उघडू दिले नाही. मात्र तिला दुसरासेट जिंकताना फारच कष्ट पडले. अखेर ती २५-०, २५-१९ अशी जिंकली. अपूर्वा आणि के नागज्योती यांनी अनुक्रमे मधुका दिलशानी (श्रीलंका) आणि अमिनय विधाध (मालदिवस) यांचा २५-५, २५-२ आणि २५-०, २५-५ असे लीलया हरविले.


आता उपांत्य फ़ेरीत एस अपूर्वा विरुध्द के नागज्योती आणि रश्मी कुमारी विरुध्द आयेशा मोहमद आशा लढती होतील. पुरुंषामध्ये प्रशांत मोरे विरुध्द राजेश गोहील आणि झहिर पाशा विरुध्द इर्शाद अहमद या लढती पाहावयस मिळतील.

आजपर्यंत वीस  ब्रेक टू-फीनिशची   नोंद झाली असून त्यापैकी एकट्या जहीर पाशाने ही किमया सात वेळा केली. याशिवाय तेरा ब्लॅक टू फीनिश पहावयास मिळाले.
या प्रतिष्ठीत आंतराष्ट्रीय चषक कॅरम स्पर्धेत एकाच वेळी ४४ आंतरराष्ट्रीय दर्जेचे सिनको कॅरम बोर्ड व सिसका स्पेशल एडीशन लेजंड कॅरम सोंगट्या वापरण्यात येत आहे. या स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कॅरम पंच श्री. अजित सावंत व त्यांचे सहायक पंच म्हणून आंतराष्ट्रीय कॅरम पंच श्री. काशीराम व श्री. केतन चिखले काम पाहत आहेत.


महत्वपूर्ण निकाल
महिला ऐकरी गट उप उपांत्य फेरी
१. एस. अपूर्वा (भारत) वि. वि. मधुका दिलशाने (श्रीलंका)- २५-०५, २५-०२
२. के. नागज्योती (भारत) वि. वि. अमिनाद विदादा (मालदीव)- २५-०, २५-०५
३. आएशा साजिद (भारत) वि. वि. रेबेका दलराईन (श्रीलंका)- २५-२४, २५-२४
४. रश्मी कुमारी (भारत) वि. वि. रोशीता जोसेफ (श्रीलंका)- २५-०, २५-१९

पुरुष ऐकरी उप उपांत्य फेरी
१. इर्शाद एहमद (भारत) वि. वि. निशांत फर्नांडो (श्रीलंका) - ०७-२५, २५-१२, २५-०७
२. प्रशांत मोरे (भारत)  वि. वि. महमद अहमद मोल्ला (बांग्लादेश) - २५-०८, २५-२०
३. राजेश गोईल (भारत) वि. वि. इस्माइल आजमीन (मालदीव)- २५-०५, २५-०५
४. जहीर पाशा (भारत) वि. वि. शाहीद इल्मी - २५-१५, २५-१०

 

Web Title: International Carrom: Prashant More, all Indians in semifinal with Apurva!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.