भारताची सुवर्णपदक विजेती संजिता चानू उत्तेजक चाचणीत दोषी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 19:44 IST2018-05-31T19:44:50+5:302018-05-31T19:44:50+5:30
गोल्ड कोस्ट येथे काही महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय सुवर्णपदक विजेती वेटलिफ्टर संजिता चानू ही उत्तेजक चाचणीत दोषी आढळली आहे.

भारताची सुवर्णपदक विजेती संजिता चानू उत्तेजक चाचणीत दोषी
नवी दिल्ली : गोल्ड कोस्ट येथे काही महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्णपदक विजेती वेटलिफ्टर संजिता चानू ही उत्तेजक चाचणीत दोषी आढळली आहे. उत्तेजकांच्या यादीत असलेले द्रव्य संजिताच्या शरीरात आढळले असून तिच्यावर आजीवन बंदीची शक्यता वर्तवली जात आहे.
आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टींग महासंघाने घेतलेल्या उत्तेजक चाचणीत संजिताला दोषी ठरवण्यात आले आहे. याबाबत महासंघाने सांगितले की, " उत्तेजक चाचणीत भारताची वेटलिफ्टर संजिता चानू ही दोषी आढळली आहे. त्यामुळ सध्याच्या घडीला तिच्यावर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणी आम्ही चौकशी करणार आहोत आणि त्यानंतरच आम्ही योग्य तो निर्णय घेणार आहोत. "
चौकशीमध्ये जर संजिता दोषी आढळली तर तिच्यासह भारतावर नामुष्कीची वेळ येईल. कारण संजिता दोषी आढळली तर तिचे पदक काढून घेण्यात येईल. त्यामुळे भारताचे राष्ट्रकुलमधील एक सुवर्णपदक कमी होऊ शकते. गोल्डकोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चानूने 53 किलो वजनी गटामध्ये सहभाग घेत एकूण 192 किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले होते.