CWG 2022:लॉन बॉल स्पर्धेत भारतीय महिलांनी रचला इतिहास; चुरशीच्या लढतीत न्यूझीलंडचा केला पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 16:07 IST2022-08-01T16:06:56+5:302022-08-01T16:07:38+5:30
राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय खेळाडूंचा डंका सुरू आहे.

CWG 2022:लॉन बॉल स्पर्धेत भारतीय महिलांनी रचला इतिहास; चुरशीच्या लढतीत न्यूझीलंडचा केला पराभव
बर्गिंहॅम : राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय खेळाडूंचा डंका सुरू आहे. आतापर्यंत भारताच्या खात्यात तीन सुवर्ण पदकांची नोंद झाली असताना भारताच्या लॉन बॉलिंगच्या महिला संघाने देखील पदक पटकावले आहे. भारतीय लॉन बॉलिंगच्या संघाने पदक जिंकून इतिहास रचला आहे. कारण भारताला या स्पर्धेत पहिलेच पदक मिळाले आहे. रुपा राणी तिर्की, नयनमोनी सैकिया, लवली चौबे आणि पिंकी सिंग या भारतीय लॉन बॉलिंगच्या महिला संघाने या खेळात भारताला पहिले राष्ट्रकुल पदक दिले आहे.
भारतीय महिलांनी रचला इतिहास
भारतीय महिलांनी शानदार खेळी करत न्यूझीलंडचा १६-१३ असा पराभव करून महिलांच्या चौकार स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि रौप्यपदकावर आपले नाव कोरले. लॉन बॉल महिला गटात भारत व न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीची लढत अत्यंत चुरशीची झाली. १-६ अशा पिछाडीवरून चार सदस्यीय भारतीय महिलांनी १०-७ अशी आघाडी मिळवली. मात्र न्यूझीलंडच्या संघाने पुनरागमन करताना १३-१२ अशी झेप घेतली, परंतु भारतीय महिलांनीही कमाल करत १६-१३ अशी आघाडी घेत बाजी मारून ऐतिहासिक पदक निश्चित केले. लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया व रुपा रानी तिर्की यांचा भारतीय संघात समावेश होता.
उद्या फायनलचा थरार
लक्षणीय बाब म्हणजे लॉन बॉल स्पर्धेतील राष्ट्रकुल स्पर्धेमधील भारताने प्रथमच पदक जिंकले आहे. या विजयासोबतच भारतीय संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात भारतीय महिलांना दक्षिण आफ्रिकेचा संघाचा सामना करावा लागणार आहे. हा सामना मंगळवारी दुपारी ४.१५ वाजता सुरू होईल.