पाकच्या तुलनेत भारतीय संघ अधिक मजबूत : इरफान
By Admin | Updated: February 11, 2015 01:38 IST2015-02-11T01:38:40+5:302015-02-11T01:38:40+5:30
गतचॅम्पियन भारतीय संघ परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघापेक्षा अधिक मजबूत असून, विश्वकप स्पर्धेत १५ फेब्रुवारी रोजी खेळल्या

पाकच्या तुलनेत भारतीय संघ अधिक मजबूत : इरफान
नवी दिल्ली : गतचॅम्पियन भारतीय संघ परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघापेक्षा अधिक मजबूत असून, विश्वकप स्पर्धेत १५ फेब्रुवारी रोजी खेळल्या जाणा-या लढतीत टीम इंडिया नक्कीच बाजी मारेल, असे मत भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने व्यक्त केले.
इरफान म्हणाला, ‘पाकच्या तुलनेत भारतीय संघ दमदार असल्यामुळे भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरेल. या लढतीत भारतच विजय मिळविणार, असा मला विश्वास आहे.’ २००७च्या विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारा इरफान पुढे म्हणाला, ‘‘दडपणाखाली दर्जेदार कामगिरी करणे यशाचे गमक ठरेल. विश्वकप स्पर्धेत अधिक दडपण असते. सर्वांची नजर तुमच्यावर असते. प्रत्येक व्यक्ती याबाबत चर्चा करतो. ही स्पर्धा चार वर्षांतून एकदा होत असल्यामुळे दडपण चारपट अधिक असते.’’ इरफान पुढे म्हणाला, ‘‘ज्या वेळी मी विंडीजमध्ये होतो, त्या वेळी आमची तयारी चांगली झाली असल्याचे आम्हाला वाटत होते. पण, आम्हाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
दडपण नेहमीच असते. पण, त्यानंतरही चमकदार कामगिरी करणे आवश्यक असते.’’
टी-२० विश्वकप स्पर्धेत भारताच्या विजयी संघाचा सदस्य असलेल्या पठाणने पाकिस्तानविरुद्धच्या संस्मरणीय लढतीची आठवण करताना सांगितले, ‘भारत-पाक लढत नेहमीच विशेष असते. त्या वेळीही दडपण होते. विश्वकप स्पर्धेत दडपण अधिक वाढते. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वकप स्पर्धेत भारत-पाक सामना टाय झाला होता. आम्ही दडपण झुगारण्यासाठी प्रयत्नशील होतो. धोनी त्या वेळी कर्णधार होता. सर्व काही नवे होते. पाकविरुद्धच्या लढतीपूर्वी केवळ पाच मिनिटांची बैठक झाली होती. आम्ही दडपण न बाळगता केवळ खेळाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करीत होतो. पण, अंतिम सामन्यात दडपण येतेच. मिस्बाहने तो फटका मारण्यापूर्वी सामना बरोबरीत होता. मी त्या लढतीत तीन बळी घेतले होते.’’
सचिन तेंडुलकरयुगाची आठवण करताना इरफान म्हणाला, ‘‘विश्वकप स्पर्धा असो किंवा नसो, पण भारतीय संघ ज्या वेळी मैदानात उतरेल, त्या वेळी सचिनची उणीव नक्की भासेल. १९९२पासून सचिन सर्वच विश्वकप स्पर्धेत सहभागी झाला आहे. विश्वकप स्पर्धेच्या इतिहासात त्याने सर्वाधिक धावा फटकाविल्या आहेत. सचिनबाबत बोलण्यासाठी मी खूप लहान व्यक्ती आहे.’’ (वृत्तसंस्था)