Indian players are busy with police duty in lockdown | लॉकडाऊनमध्ये पोलीस कर्तव्यात व्यस्त आहेत भारतीय खेळाडू

लॉकडाऊनमध्ये पोलीस कर्तव्यात व्यस्त आहेत भारतीय खेळाडू

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे देशभर लॉकडाऊन झाले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी पोलीस सध्या घरापासून आणि कुटुंबापासून दूर कर्तव्य बजावत आहेत. रस्त्यावर गर्दी करू नका, घराबाहेर येऊ नका, असे सातत्याने आवाहन करीत आहेत. क्रीडा मैदानावर देशासाठी शानदार कामगिरी करणाºया खेळाडूंनी या कार्यात स्वत:ला झोकून दिले असून पोलीस दलातील हे खेळाडू सध्या देशकर्तव्य बजावत आहेत.

विश्वचषक विजेता क्रिकेटपटू जोगिंदर शर्मा, भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार राजपालसिंग, राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता माजी बॉक्सर अखिलकुमार आणि आशियाई क्रीडा स्पर्धेचा चॅम्पियन कबड्डीपटू अजय ठाकूर आदी सर्वजण पूर्णवेळ पोलीस अधिकारी आहेत. क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या उपलब्धीमुळे त्यांना ही नोकरी मिळाली.

मोहालीत डीएसपी पदावर कार्यरत राजपाल म्हणाला,‘मी पोलीसमध्ये पूर्णवेळ कार्यरत आहे. लॉकडाऊनचे पालन व्हावे यासाठी झटत आहे. गरजूंना आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे. अशावेळी संयम पाळण्याची गरज आहे शिवाय पोलिसांचा मानवी चेहरा पुढे यायला हवा. लोकांमधील भीती नाहीशी व्हावी आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत.’

टी२० विश्वचषक २००७ च्या फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध अखेरच्या षटकात विजय मिळवून देणारा गोलंदाज जोगिंदर शर्मा म्हणाला, ‘२००७ पासून हरियाणा पोलीस दलात मी डीएसपी आहे. सध्या वेगळ्या प्रकारच्या आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. सकाळी ६ वाजेपासून लोकांना सावध करणे, कर्फ्यूचे पालन करायला लावणे आणि त्यांना आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम करतो.

’गुरुग्राम पोलीस दलात एसीपी राष्टÑकुल २००६ चा सुवर्ण विजेता अखिल कुमार म्हणाला, ‘लोकांचे सहकार्य मिळत आहे. अत्यावश्यक वस्तू सहज मिळत असल्याने अफवांवर आळा बसला. लॉकडाऊनचे तंतोतंत पालन केल्यानेच कोरोनाचे भय नष्ट होईल, हे लोकांनादेखील पटले आहे.’

३८ वा वाढदिवस साजरा करणाºया अखिलने मित्रांसोबत निधी गोळा करून त्यातून गरिबांना खाण्या-पिण्याच्या वस्तू आणि सॅनिटायझर उपलब्ध करून दिले.रेवाडी येथे कार्यरत आशियाई स्पर्धेचा कांस्य विजेता जितेंदर म्हणाला,‘ आम्ही सर्व प्रयत्न करीत आहोत. भूक काय असते याची जाणीव असल्यामुळे पोलीस असलो तरी मानवी भावनेतून कामात व्यस्त आहोत. सेवा, सुरक्षा आणि सहकार्य ही पोलीस खात्याची त्रिसूत्री आहे. त्यावर अंमल करण्याची हीच वेळ आहे.’अर्जुन पुरस्कार तसेच पद्मश्री विजेता कबड्डीपटू ठाकूर हा हिमाचल प्रदेश पोलीस दलात कार्यरत असून बिलासपूरमध्ये तैनात आहे.

तो म्हणाला, ‘आम्ही मास्क आणि सॅनिटायझर सोबत बाळगतो. तथापि लोकांनी रस्त्यावर येऊ नये, ही आमची मोठी चिंता आहे. खेळाडू या नात्याने संयम काय असतो, हे इतरांंना पाटवून सांगतो. सद्यस्थितीवर मात करण्यासाठी संयम हाच मोठा उपाय ठरणार आहे.’ 

Web Title: Indian players are busy with police duty in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.