India vs China Hockey Asia Cup 2025 : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्म दिनी देशभरात क्रीडा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बिहारच्या राजगीरच्या मैदानात भारत-चीन यांच्यातील लढतीसह हॉकीतील आशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली. हमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सलामीच्या लढतीत ४-३ असा विजय नोंदवत प्रतिष्ठित स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कॅप्टन हरमनप्रीतची हॅटट्रिक
भारतीय हॉकी संघाने 'अ' गटात चीन विरुद्धच्या लढतीनं आशिया कप स्पर्धेतील यंदाच्या हंगामाची सुरुवात केली. या सामन्यात पहिला गोल हा चीनच्या संघाने डागला. पहिल्या क्वार्टरमध्ये १-० अशी आघाडी घेतल्यावर भारतीय संघाने फार वेळ न घालवता १-१ असा बरोबरीचा डाव साधला. त्यानंतर भारतीय संघाने आक्रमक अंदाजात खेळ दाखवत आघाडी ३-१ अशी केली. भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगनं तीन गोल डागले. चीनच्या संघाने अखेरच्या क्वॉर्टरपर्यंत विजयासी आस टिकवली. पण शेवटी भारतीय संघाने ४-३ अशा फरकासही सामना जिंकला.
३-३ बरोबरी अन् भारताने एक गोल डागत दिली विजयी सलामी
तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारत-चीन दोन्ही संघाच्या खात्यात प्रत्येकी ३-३ गोल जमा झाले होते. अखेरच्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंहनं ४७ व्या मिनिटांत पेनल्टी कॉर्नरची संधी गोलमध्ये रुपांतरित करत भारताला ४-३ अशी आघाडी मिळवून दिली. हा गोल भारतीय संघाचा विजय निश्चित करण्यासाठी उपयुक्त ठरला. भारतीय संघाने या विजयासह ३ गुण आपल्या खात्यात जमा केले असून गुणतालिकेत जपान पाठोपाठ भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे.