प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 13:36 IST2025-10-28T13:35:44+5:302025-10-28T13:36:06+5:30
नाकामुराच्या ‘त्या’ कृतीला गुकेशचे शांततेत प्रत्युत्तर; 'क्लच चेस' स्पर्धेत भारताची आघाडी!

प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
D Gukesh vs Hikaru Nakamura : ‘क्लच चेस: चॅम्पियन्स शो डाउन’च्या पहिल्याच दिवशी प्रसिद्ध भारतीय बुद्धबळपटू डी. गुकेशने हिकारू नाकामुराला हरवून सर्वांना आश्चर्यचकित केले. विशेष म्हणजे, काही आठवड्यांपूर्वी नाकामुराने गुकेशचा पराभव केल्यानंतर, त्याचा 'राजा' प्रेक्षकांच्या दिशेने भिरकावला होता. त्याच्या या कृतीवर अनेकांनी टीका केली होती. आता गुकेशने नाकामुराचा पराभव करत, त्या घटनेचा बदला घेतला.
पहिल्या दिवशी गुकेशची दमदार सुरुवात
Check out the final moments of Gukesh beating Hikaru Nakamura with the Black pieces at Champions Showdown! pic.twitter.com/RqgW6WtCZ9
— ChessBase India (@ChessbaseIndia) October 27, 2025
अमेरिकेतील सेंट लुइस चेस क्लब येथे सुरू असलेल्या ‘Clutch Chess: Champions Showdown’ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी विश्वविजेता गुकेशने अप्रतिम प्रदर्शन करत आघाडी घेतली. या स्पर्धेत जगातील चार दिग्गज खेळाडू गुकेश, मॅग्नस कार्लसन, हिकारू नाकामुरा आणि फॅबियानो कारुआना सहभागी आहेत.
पहिल्या राऊंडमध्ये गुकेशला कार्लसनकडून 1.5-0.5 ने पराभव पत्करावा लागला. मात्र, दुसऱ्या राऊंडमध्ये त्याने जोरदार पुनरागमन करत नाकामुराला 1.5-0.5 ने हरवले, तर तिसऱ्या राऊंडमध्ये कारुआनावर 2–0 ने विजय मिळवला. अशाप्रकारे पहिल्या दिवसाअखेर गुकेश 6 पैकी 4 गुणांसह आघाडीवर होता, तर कार्लसन (3.5), नाकामुरा (3) आणि कारुआना (1.5) त्यांच्यामागे होते.
HIKARU THROWS A PIECE TO THE CROWD TO CELEBRATE THE USA 5-0! @GMHikaru
— Chess.com (@chesscom) October 5, 2025
What an event!! 🔥👏 @CheckmateUSAINDpic.twitter.com/LGnM8JLulJ
नाकामुराने ‘राजा’ फेकला; गुकेशने टप्प्यात कार्यक्रम केला
काही आठवड्यांपूर्वी झालेल्या ‘Checkmate: USA vs India’ या प्रदर्शनात्मक सामन्यात नाकामुराने विजय मिळवल्यानंतर गुकेशचा 'राजा' प्रेक्षकांच्या दिशेने फेकला होता. तो क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि अनेकांनी त्याच्यावर टीका केली. मात्र, हे केवळ मनोरंजनासाठी केल्याचे स्पष्टीकरण नाकामुराने दिले होते. त्यावेळी गुकेश नेहमीप्रमाणे शांत राहिला, कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तोंडाने बोलण्यापेक्षा चेस बोर्डवरच उत्तर देण्याची जिद्द मनाशी बांधली आणि आता ‘क्लच चेस: चॅम्पियन्स शो डाउन’मध्ये नाकामुराचा टप्प्यात कार्यक्रम केला.
स्पर्धेचे स्वरूप आणि इनामी रक्कम
ही स्पर्धा 25 ते 30 ऑक्टोबर दरम्यान चालणार असून एकूण 9 राऊंड्स (18 गेम्स) खेळवले जातील. तीन डबल राऊंड-रॉबिन स्वरूपात घेतले जाईल. प्रत्येक टप्प्यात गुण आणि बक्षिसाची रक्कम वाढत जाणार. दुसऱ्या दिवशी दुप्पट गुण आणि अंतिम टप्प्यात तिप्पट गुण मिळतील.
विजेत्याला एकूण $4,12,000 (सुमारे ₹3.63 कोटी) मिळणार आहेत, तर स्टँडिंग प्राइज म्हणून $3 लाखहून अधिक रक्कम ठेवण्यात आली आहे.
पहिल्या क्रमांकावर येणाऱ्याला - $1,20,000 (₹1.06 कोटी)
दुसऱ्याला - $90,000 (₹79 लाख)
तिसऱ्याला - $70,000 (₹62 लाख)
चौथ्याला - $60,000 (₹53 लाख)
प्रत्येक राऊंड-रॉबिनमध्ये विजयावर बोनस इनाम देखील दिला जाईल, जो $1,000, $2,000 आणि $3,000 असेल.