यजमान सीसीआय उपांत्य फेरीत
By Admin | Updated: June 13, 2015 01:40 IST2015-06-13T01:40:03+5:302015-06-13T01:40:03+5:30
यजमान सीसीआय आणि कसलेल्या एमआयजी क्लब या संघांनी आपापल्या सामन्यात निर्णायक बाजी मारताना कानजी स्मृती ज्युनियर

यजमान सीसीआय उपांत्य फेरीत
मुंबई : यजमान सीसीआय आणि कसलेल्या एमआयजी क्लब या संघांनी आपापल्या सामन्यात निर्णायक बाजी मारताना कानजी स्मृती ज्युनियर चषक आंतर क्लब बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
क्रिकेट क्लब आॅफ इंडिया येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत यजमानांनी ३-० असा सहज विजय मिळवताना खार जिमखानाचा धुव्वा उडवला. मुलींच्या एकेरी सामन्यात ह्रीष्णा दुबेने मान्या अवलानीचा २१-१०, २१-१० असा पराभव केल्यानंतर वरुण दवे यानेदेखील सरळ दोन सेटमध्ये बाजी मारताना देवांश मेहरोत्राचा २१-१५, २१-१३ असा फडशा पाडून सीसीआयला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतरच्या दुहेरी सामन्यात करीना मदन - रिया अरोलकर यांनी आक्रमक खेळ करताना राधिका - तन्वी यांचा २१-१८, २१-६ असा धुव्वा उडवून सीसीआयला उपांत्य फेरीत नेले.
एमआयजी क्लबनेदेखील सफाईदार विजयासह कूच करताना एनएससीआयचा ३-० असा दणदणीत पराभव केला. मुलींच्या एकेरीच्या लढतीत पहिला सेट गमावून पिछाडीवर पडल्यानंतर रुद्रा राणे हिने जबरदस्त पुनरागमन करताना सामीआ शाहचा १८-२१, २१-१९, २१-१० असा पाडाव केला.
यानंतरच्या मुलांच्या एकेरी सामन्यात वेदान्त शाहने तुफान आक्रमक खेळ करताना नील गांधीचा २१-२, २१-४ असा चुराडा करून एमआयजीची आघाडी २-० अशी भक्कम केली. तर, मुलींच्या दुहेरी सामन्यात सानिया शिवलकर - रुद्रा राणे यांनी सरळ दोन सेटमध्ये बाजी मारताना सामीआ शाह - अंगेला यांचा २१-१३, २१-५ असा धुव्वा उडवून एमआयजीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्याचवेळी दुसऱ्या बाजूला गोरेगाव एससी संघानेदेखील दिमाखात उपांत्य फेरी गाठताना कसलेल्या कॅथलिक जिम संघाला ३-० असा अनपेक्षित धक्का दिला. तसेच माटुंगा जिमखानाने एकतर्फी झालेल्या सामन्यात अनुभवी पीजे हिंदू जिमखाना संघाला कोणतीही संधी न देता ३-० असे नमवले आणि
उपांत्य फेरीत प्रवेश केला. (क्रीडा प्रतिनिधी)