हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरींचे मानधन रखडले; ३२हून अधिक ज्येष्ठ मल्लांची परवड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 05:09 AM2019-12-02T05:09:14+5:302019-12-02T05:09:58+5:30

आयुष्यभर पैलवानकी केलेल्या मल्लांना योग्य आहार मिळत नसल्याने अनेकांना व्याधींनी ग्रासले आहे.

Hindesari, Maharashtra Kesari honored; Affordability of more than 3 senior sailors | हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरींचे मानधन रखडले; ३२हून अधिक ज्येष्ठ मल्लांची परवड

हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरींचे मानधन रखडले; ३२हून अधिक ज्येष्ठ मल्लांची परवड

googlenewsNext

- सचिन भोसले

कोल्हापूर : राज्यातील सात ‘हिंदकेसरीं’सह ३२ हून अधिक ‘महाराष्ट्र केसरी’ ज्येष्ठ मल्लांचे मानधन गेल्या आठ महिन्यांपासून रखडले आहे. हे मानधन प्रतिमहिन्यात किमान सात तारखेपर्यंत खात्यावर जमा व्हावे, अशी मल्लांची सर्वसाधारण अपेक्षा असते; पण अर्ज विनंत्या करूनही या मल्लांना क्रीडा विभाग आज, उद्या असे करीत टोलवत असल्याने ‘अरं आमची दखल कोण घेणार हाय का? असा आर्त स्वर आखाड्यात घुमू लागला आहे.
हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लांना राज्यशासन प्रतिमहिना सहा हजार रुपये इतके मानधन देते; मात्र हे मानधन गेल्या आठ महिन्यांपासून मल्लांना न मिळाल्याने यावरच निर्वाह असलेल्या मल्लांचे हाल सुरू आहेत. आयुष्यभर पैलवानकी केलेल्या मल्लांना योग्य आहार मिळत नसल्याने अनेकांना व्याधींनी ग्रासले आहे. औषधोपचारांचा खर्च न परवडणारा आहे. सर्वजण अशा या मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनावरच अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत राज्याचे क्रीडा मंत्रालयही या मल्लांची दाद घेत नाही. क्रीडा कार्यालयाकडे वारंवार दाद मागूनही यावर काहीच कार्यवाही होत नाही. गेल्या काही वर्षांपासून प्रत्येकवेळी आम्हाला अर्ज विनंत्या करीत दाद मागावी लागत आहे; त्यामुळे ‘उद्धव ठाकरे’ यांच्या सरकारने तरी आमची विचारपूस करीत मानधन वाढवून वेळच्या वेळी द्यावे, अशी मागणी केली आहे. हिंदकेसरी मल्लांना किमान २५ हजार, तर महाराष्ट्र केसरी मल्लांना प्रतिमहिना किमान २० हजार इतके तरी मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

मानधनासह नोकरीच्या अपेक्षा अशा
हिंदकेसरी विजेत्यांना २५ हजार, महाराष्ट्र केसरींना २०, आंतरराष्ट्रीय मल्लांना १०, भारत व महाराष्ट्र चॅम्पियन मल्लांना परीक्षेऐवजी कामगिरीनुसार नोकरीत प्राधान्य द्यावे. महाराष्ट्र केसरी एकवेळ घेतलेल्या मल्लाला वर्ग तीनची नोकरी, तीनवेळा घेतलेल्या मल्लांना वर्ग एक मध्ये नोकरी मिळावी.

हिंदकेसरी असे : राज्यात श्रीपती खंचनाळे, स्वर्गीय गणपतराव आंदळकर, स्वर्गीय मारुती माने, स्वर्गीय दादू चौगुले, दीनानाथसिंह, हरिश्चंद्र बिराजदार, विनोद चौगुले, योगेश दोडके, अमोल बराटे, अमोल बुचडे यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र केसरी असे : स्वर्गीय दिनकर पाटील, स्वर्गीय भगवान मोरे, स्वर्गीय गणपत खेडकर, दीनानाथसिंह, स्वर्गीय चंबा मुत्नाळ, स्वर्गीय दादू चौगुले, स्वर्गीय लक्ष्मण वडार, स्वर्गीय हिरामण बनकर, इस्माईल शेख, विष्णू जोशीलकर, स्वर्गीय गुलाब बर्डे, स्वर्गीय तानाजी बनकर, रावसाहेब मगर, अप्पालाल शेख, उदयराज यादव, संजय पाटील, शिवाजी कैकण, अशोक शिर्के, गोरख सिरक, धनाजी फडतारे, विनोद चौगुले, राहुल काळभोर, मुन्नालाल शेख, दत्ता गायकवाड, सय्यद चौस, अमोल बुचडे, चंद्रहार पाटील, विजय बनकर, समाधान घोडके, नरसिंग यादव, विजय चौधरी, बाला रफिक यांचा समावेश आहे.

हिंदकेसरींना किमान प्रतिमहिना वेळच्या वेळी २५ हजार रुपये तरी मानधन राज्यसरकारने द्यावे. महाराष्ट्रात केवळ सहा हिंदकेसरी उरले आहेत. याचा तरी विचार सरकारने गांभीर्याने करावा.
- हिंदकेसरी दीनानाथसिंह

आयुष्यभर कुस्ती केल्यानंतर मल्लांना शासनाने खेळ जोपासल्याबद्दल उतारवयात तरी औषधोपचार करण्यासाठी तरी मानधन वेळच्या वेळी द्यावे. राज्य सरकारने मानधनात भरघोस वाढ करावी.
- विष्णू जोशीलकर, महाराष्ट्र केसरी

Web Title: Hindesari, Maharashtra Kesari honored; Affordability of more than 3 senior sailors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.