Global Chess: India's Shri hari and Anibandh on top | जागतिक बुद्धिबळ : भारताच्या श्रीहरी, अबिनंधन अग्रस्थानी
जागतिक बुद्धिबळ : भारताच्या श्रीहरी, अबिनंधन अग्रस्थानी

मुंबई : जागतिक युवा खुल्या १४ वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेमधील सातव्या साखळी फेरीत भारताचे बारावा मानांकित एल.आर. श्रीहरी व ५५ व्या क्रमांकावर असलेल्या आर. अबिनंधन यांनी सनसनाटी विजय मिळवून अग्रस्थानी आघाडीत मुसंडी मारली आहे. श्रीहरीने पाचवा मानांकित भारताचा प्रणव आनंदला तर अबिनंधनने चौथा मानांकित रशियाच्या आंद्रेय त्स्वेतकोव्हला शह दिला. या गटात श्रीहरी, अबिनंधन व ऐडीन  सुलेमानली यांच्याकडे साखळी ६ गुणांसह प्रथम स्थानाची संयुक्त आघाडी आहे. मुलींच्या १४ वर्षाखालील गटात भारताच्या रक्षिता रवीने रशियाच्या एकातेरिना नास्यरोव्ह व नेदरलँडच्या रोबर्स एली सोबत साखळी ६ गुणांसह अग्रस्थानी आघाडी घेतली आहे.   

 खुल्या १४ वर्षांखालील गटात दुसऱ्या पटावर भारताच्या एल. श्रीहरीने (६ गुण) पाचवा मानांकित प्रणव आनंदला (५ गुण) पराभवाचा धक्का दिला. आल्बिन  काऊंटर गँबिट प्रकाराने सुरु झालेल्या या डावात प्रणवने काही निकृष्ट चाली रचल्या आणि त्याचा फायदा घेत श्रीहरीने ४० चालींत  धक्कादायक विजयाची नोंद केली. पहिल्या पटावर तृतीय मानांकित अझरबैजानचा आंतरराष्ट्रीय मास्टर ऐडीन सुलेमानली (६ गुण)  विरुद्ध अव्वल मानांकित भारताचा श्रीश्वान (५.५ गुण) यामधील लढत बरोबरीत संपली. सिसिलियन बचाव पद्धतीने तब्बल ६१ चालीपर्यंत रंगलेल्या लढतीत अबिनंधनने (६ गुण) अचूक खेळ करीत चौथ्या मानांकित फिडे मास्टर आंद्रेय त्स्वेतकोव्हवर विजय मिळविला. १४ वर्षाखालील मुलींमध्ये द्वितीय मानांकित रक्षिता रवीने  भारताच्याच नवव्या मानांकित ध्याना पटेलचा, चौथ्या मानांकित एकातेरिना नास्यरोव्हाने सोळाव्या मानांकित मुन्गुंझुलचा तर पाचव्या मानांकित रोबर्स एलीने इंचे सफीयेचा पराभव करून सहाव्या साखळी गुणासह संयुक्त आघाडी घेतली.


Web Title: Global Chess: India's Shri hari and Anibandh on top
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.