आॅलिम्पिकमध्ये रशियाच्या सहभागाचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: July 25, 2016 00:25 IST2016-07-25T00:10:28+5:302016-07-25T00:25:48+5:30
आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने (आयओसी) ५ आॅगस्टपासून सुरू होत असलेल्या रिओ आॅलिम्पिकमध्ये रशियाला सहभागी होण्यास परवानगी दिली आहे.

आॅलिम्पिकमध्ये रशियाच्या सहभागाचा मार्ग मोकळा
ऑनलाइन लोकमत
लुसाने, दि. २५ : आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने (आयओसी) ५ आॅगस्टपासून सुरू होत असलेल्या रिओ आॅलिम्पिकमध्ये रशियाला सहभागी होण्यास परवानगी दिली आहे. खराब डोपिंग रेकॉर्ड असला तरी रशियावर पूर्ण बंदी घालण्यात येणार नसल्याचे आयओसीने स्पष्ट केले.
आयओसीने रशियन खेळाडूंबाबतचा निर्णय घेण्याचा अधिक विविध खेळांच्या क्रीडा महासंघांना दिला आहे. आयओसीच्या निर्णयामुळे रशियावर रिओ आॅलिम्पिकमधून बाहेर राहण्याचा धोका टळला आहे. आता रशियन खेळाडूंवर बंदी घालायची किंवा नाही याचा निर्णय क्रीडा महासंघांना घ्यायचा आहे. आॅलिम्पिक प्रारंभ होण्यास १२ दिवसांचा अवधी शिल्लक असताना या निर्णयामुळे आॅलिम्पिक आंदोलनाची दोन गटात विभागणी होण्याचे टळले आहे.
विश्व डोपिंग विरोधी एजन्सीच्या (वाडा) मॅक्लारेन अहवालानंतर रशियावर रिओ आॅलिम्पिकमध्ये बंदी घालण्याची मागणी करण्यात येत होती. मॅक्लारेन यांच्या अहवालामध्ये रशियन सरकार खेळाडूंसाठी डोपिंग कार्यक्रम राबवित असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यासाठी २०१४ मध्ये सोच्ची येथे झालेल्या शीतकालीन आॅलिम्पिकचे उदाहरण देण्यात आले होते.
आयओसीने या अहवानंतर रविवारी आपल्या १५ सदस्यांच्या कार्यकारी बोर्डाची टेलिकॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक आयोजित करीत हा निर्णय जाहीर केला.
आयओसीने निर्णय घेतला की रशियन खेळाडूंना आॅलिम्पिकमध्ये सहभागी करण्याचा निर्णय त्या खेळांचे आंतरराष्ट्रीय महासंघ घेतील. वाडा मॅक्लारेनमध्ये ज्या रशियन अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख आहे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई सोमवारपासून प्रारंभ होईल. खेळातील सर्वोच्च लवादाने रशियन खेळाडूंवर रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधातील अपील गुरुवारी फेटाळले.