Asian Games 2018: अंतिम ध्येय ‘आॅलिम्पिक सुवर्णपदक - राही सरनोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 06:36 IST2018-09-12T01:34:55+5:302018-09-12T06:36:19+5:30
Asian Games 2018: ‘गेल्या चार वर्षांत मी पदकापासून दूर होते. या काळात मी संयम बाळगला आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णमयी कामगिरी करीत २५ मीटर पिस्तल प्रकारात महिलांमध्ये पहिल्यांदा सुवर्णपदक पटकाविले.

Asian Games 2018: अंतिम ध्येय ‘आॅलिम्पिक सुवर्णपदक - राही सरनोबत
कोल्हापूर : ‘गेल्या चार वर्षांत मी पदकापासून दूर होते. या काळात मी संयम बाळगला आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णमयी कामगिरी करीत २५ मीटर पिस्तल प्रकारात महिलांमध्ये पहिल्यांदा सुवर्णपदक पटकाविले. या यशानंतर माझे अंतिम ध्येय २०२० मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देशाची मान आणखी उंचवण्याचे आहे,’ असे मत आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिने व्यक्त केले. मंगळवारी राहीचे कोल्हापुरातील ताराराणी चौक येथे जल्लोषात स्वागत झाले. याप्रसंगी ती बोलत होती.
राही म्हणाली, ‘दुखापतीमुळे एक वर्ष मला पिस्तूल हाताळायचे नाही, असे डॉक्टरांनी सांगितल्याने सरावापासून दूर होते. त्यातून भरारी घेऊन मी देशाला २५ मीटर पिस्तूल प्रकारात पहिले सुवर्णपदक तेही आशियाई स्पर्धेत. या यशात कोल्हापूरच्या जनतेचा व आई-वडील, प्रशिक्षक तसेच मी ज्या महसूल खात्यात काम करते त्या सर्व अधिकारी, कर्मचाºयांचा मोठा वाटा आहे. माझे अंतिम ध्येय आॅलिम्पिक सुवर्णपदक जिंकणे हेच आहे. त्याकरिता मी पहिला टप्पा म्हणून आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.’
त्याचप्रमाणे, ‘खरी लढाई आता २०२० आॅलिम्पिक सुवर्णपदक पटकावून जिंकायची आहे. टेनिस एल्बोतून सावरताना मी संयम बाळगणे शिकले आणि हाच संयम मला यशापर्यंत घेऊन गेला. त्यामुळे नवोदित नेमबाजांनीही संयम बाळगणे लक्षात ठेवले पाहिजे. माझ्या दुखापतीच्या काळात केवळ कोल्हापूरच्या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखविला; त्यामुळे मी सुवर्ण शिखरापर्यंत पोहोचले,’ असेही राही यावेळी म्हणाली.
>ईस्ट आॅर वेस्ट, ‘राही’ इज द बेस्ट!
राही ही ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलची माजी विद्यार्थिनी असून या शाळेच्या विद्यार्थिनींनीही तिचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी या विद्यार्थिनींनी ‘ईस्ट आॅर वेस्ट, ‘राही’ इज द बेस्ट’ हा नारा देत परिसर दणाणून सोडला. आशियाई स्पर्धेनंतर पहिल्यांदाच घरी परतलेल्या राहीने राजारामपुरी येथे आई प्रभा व वडील जीवन यांच्यासह सुवर्णपदकाचा आनंद साजरा केला.