लंकेला सूर गवसण्याची अपेक्षा
By Admin | Updated: February 26, 2015 00:53 IST2015-02-26T00:53:04+5:302015-02-26T00:53:04+5:30
चांगली कामगिरी करण्यात सतत अपयशी ठरणाऱ्या श्रीलंका संघाला उद्या (गुरुवारी) विश्वचषकात बांगलादेशाविरुद्ध धडाकेबाज कामगिरीसह

लंकेला सूर गवसण्याची अपेक्षा
मेलबर्न : चांगली कामगिरी करण्यात सतत अपयशी ठरणाऱ्या श्रीलंका संघाला उद्या (गुरुवारी) विश्वचषकात बांगलादेशाविरुद्ध धडाकेबाज कामगिरीसह विजय मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या दोन विश्वचषकांचा उपविजेता लंकेचा संघ यंदा ठोस सुरुवात करू शकला नाही. न्यूझीलंडच्या खेळपट्ट्यांवर त्यांच्या फलंदाजांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागले. या सामन्यामध्ये जीवन मेंडीजच्या ऐवजी उपल तरंगाला संधी देण्यात येण्याची शक्यता आहे.
ख्राईस्टचर्चच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने लंकेचा ९८ धावांनी पराभव केला. ड्यूनेडिनच्या दुसऱ्या सामन्यातही अफगाणिस्तानविरुद्ध त्यांचे सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाले. अनुभवी माहेला जयवर्धने याने बुडते जहाज किनाऱ्याला लावून मोठ्या पराभवापासून वाचविले होते. अफगाणिस्तानच्या २३२ धावांचा पाठलाग करणाऱ्या लंकेने १८ धावांत ३, तसेच ५१ धावांत ४ गडी गमावले. दोन सामन्यांत लंकेचे केवळ २ गुण असल्याने मोठ्या विजयासह लय मिळविण्याच्या प्रतीक्षेत हा संघ दिसतो.
१९९६च्या विश्वविजेत्या लंकेने बांगलादेशाविरुद्ध आतापर्यंत ३७ वन डे खेळले. त्यांत ३२ जिंकले. विश्वचषकातील या संघाचा रेकॉर्ड फार चांगला आहे. २००३च्या विश्वचषकात बांगलादेशावर दहा गड्यांनी विजय नोंदविला होता. शिवाय, २००७मध्ये १९८ धावांनी धुव्वा उडविला.
अफगाणिस्तानविरुद्ध विजय नोंदविल्यानंतर माहेलाने कबुली दिली, की संघात सुधारणा होण्यास वाव आहे. अशा प्रकारच्या सामन्यात विजयासाठी संघर्ष करणे योग्य लक्षण आहे. संघाची कामगिरी सुधारायला हवी. कुमार संगकारा आणि तिलकरत्ने दिलशान हे अद्याप चमकले नाहीत. याशिवाय, दिशाहीन गोलंदाजी मुख्य चिंता राहिली आहे. अफागाणिस्तानविरुद्ध त्यांच्या गोलंदाजांनी १६ वाईड आणि एक नो बॉल टाकला होता. वेगवान लसिथ मलिंगाने तर २ सामन्यांत १२५ धावा मोजल्या.
दुसरीकडे, बांगलादेश संघ दोन्ही सामन्यांत अपराजित राहिला. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत पावसामुळे गुणविभागणी झाल्यानंतर अफगाणिस्तावर त्यांनी १०५ धावांनी विजय साजरा करताच अ गटातून उपांत्यपूर्व फेरीचा मार्ग प्रशस्त केला. यापुढील ४ सामने त्यांना श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि स्कॉटलंडविरुद्ध खेळायचे आहेत. बांगलादेश संघ पहिल्यांदा एमसीजीवर खेळणार आहे. या संघाचा वेगवान गोलंदाज अल् अमीन
हुसेन रात्री १० नंतर हॉटेलमध्ये परतल्याने त्याला आयसीसीने विश्वचषकात खेळण्यास बंदी घातली. त्याची जागा शफीउल इस्लामने घेतली. (वृत्तसंस्था)