‘पद्मविभूषण’नंतर ‘भारत रत्न’चे स्वप्न, चॅम्पियन बॉक्सर एमसी मेरीकोमचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 05:20 IST2020-01-27T05:15:59+5:302020-01-27T05:20:01+5:30
३६ वर्षाच्या मेरीचे लक्ष्य टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठणे हे आहे.

‘पद्मविभूषण’नंतर ‘भारत रत्न’चे स्वप्न, चॅम्पियन बॉक्सर एमसी मेरीकोमचा निर्धार
नवी दिल्ली : पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याचा मला गर्व आहे, मात्र टोकियो आॅलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकून ‘भारतरत्न’ बनण्याचा निर्धार चॅम्पियन महिला बॉक्सर एम. सी. मेरीकोम हिने रविवारी व्यक्त केला.
सहा वेळेची विश्वचॅम्पियन मेरीकोम पत्रकारांशी बोलताना म्हणाली,‘ भारतरत्न मिळविणे माझे स्वप्न आहे. पद्मविभूषणमुळे आणखी उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा लाभणार आहे. मी भारतरत्न बनावे, असा निर्धार हा पुरस्कार मिळल्यानंतरच माझ्या मनात डोकावला.’
मेरी पुढे म्हणाली,‘भारतरत्नने सन्मानित झालेला सचिन तेंडुलकर हा एकमेव खेळाडू आहे. मी देखील सचिनसारखा सन्मान जिंकू इच्छिते. मला सचिनकडून प्रेरणा मिळते मी देखील त्याच्या पावलांवर पाऊल टाकून भारतरत्न पुरस्कार पटकावणारी पहिली महिला खेळाडू बनू इच्छिते.’
३६ वर्षाच्या मेरीचे लक्ष्य टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठणे हे आहे. नंतर पदकाचा रंग कुठला असावा याचा विचार करणार आहे. मी पात्रता गाठण्यात यशस्वी झाले तर निश्चितपणे सुवर्ण जिंकण्याच्या इराद्यानेच उतरणार आहे. ‘भारतरत्न’ हा सन्मान केवळ खेळाडूंसाठी नव्हे तर कुठल्याही भारतीयांसाठी मोठा गर्व आहे. भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असल्याने माझ्या नावापुढे हा सन्मान लागावा, असे आता मनोमन वाटू लागले असल्याचे मेरीने सांगितले.(वृत्तसंस्था)