तुम्हाला निकाल गुप्त हवाय की सार्वजनिक? विनेश फोगाटला आला क्रीडा लवादाच्या प्रश्नांचा मेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 14:42 IST2024-08-11T14:42:42+5:302024-08-11T14:42:53+5:30
Vinesh Phogat News: विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधून अपात्र केल्याच्या विरोधात केलेल्या अपिलावर आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडून निर्णय दिला जाणार आहे.

तुम्हाला निकाल गुप्त हवाय की सार्वजनिक? विनेश फोगाटला आला क्रीडा लवादाच्या प्रश्नांचा मेल
भारतीय कुस्तीपटू फायनलमध्ये जाऊनही तिला सामन्याच्या दिवशी अवघे १०० ग्रॅम वजन जास्त भरले म्हणून अपात्र ठरविण्यात आले. अवघा भारत तिच्या गोल्ड मेडलची वाट पाहत असताना सकाळीच करोडो लोकांचा अपेक्षाभंग झाला. ऑलिम्पिकच्या या निर्णयाविरोधात जनमत संतप्त झाले. संसदेतही प्रतिक्रिया उमटली. या निर्णयाविरोधात अपिलही करण्यात आले. सुनावणीवर शनिवारी निकाल येणे अपेक्षित होते. परंतू तो आता १३ ऑगस्टला देण्यात येणार आहे.
विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधून अपात्र केल्याच्या विरोधात केलेल्या अपिलावर आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडून निर्णय दिला जाणार आहे. तिच्या बाजुने निकाल आला तर तिला सुवर्ण पदक मिळण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेसाठी क्रीडा लवादाकडून फोगाटला तीन प्रश्न विचारण्यात आले आहेत. या प्रश्नांचे उत्तर फोगाटला १२ ऑगस्टपर्यंत द्यायचे आहे.
विनेश फोगाटला क्रीडा लवादाकडून मेल करण्यात आला आहे. यामध्ये काही प्रश्न विचारण्यात आले असून त्याची उत्तरे मागविण्यात आली आहेत. यापैकी पहिला प्रश्न असा आहे की, दुसऱ्या दिवशीही तुम्हाला स्वतःचे वजन करावे लागते हा नियम तुम्हाला माहीत होता का? दुसरा प्रश्न सध्याची रौप्य पदक जिंकणारी क्यूबन कुस्तीपटू तिचे रौप्य पदक तुमच्यासोबत शेअर करेल का? आणि तिसरा प्रश्न या अपीलचा निर्णय सार्वजनिक किंवा गोपनीय पद्धतीने तुम्हाला कळवला जावा असे तुम्हाला वाटते का? असे विचारण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडून (Court of Arbitration for Sports) विनेश फोगाटसह भारताच्या बाजूनं निकाल लागणार का? ते पाहण्याजोगे असेल. हा निकाल सकारात्मक असेल, असा विश्वास भारतीय ऑलिम्पिक समितीनंही व्यक्त केला आहे. विनेश फोगाट हिने संबंधित याचिकेच्या माध्यमातून संयुक्त रौप्य पदक मिळावे, अशी विनंती केली आहे. जर निकाल तिच्या बाजूनं लागला तर भारताच्या खात्यात आणखी एका रौप्य पदकाची भर पडेल.