धवन, विजय यांच्या मानांकनात सुधारणा

By Admin | Updated: June 16, 2015 02:09 IST2015-06-16T02:09:45+5:302015-06-16T02:09:45+5:30

आॅस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज स्टीव्हन स्मिथ याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

Dhawan, Vijay's performance improved | धवन, विजय यांच्या मानांकनात सुधारणा

धवन, विजय यांच्या मानांकनात सुधारणा

दुबई : आॅस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज स्टीव्हन स्मिथ याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यानंतर अशी कामगिरी करणारा स्मिथ सर्वांत युवा फलंदाज ठरला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली अव्वल दहांच्या यादीतून बाहेर गेला असून, शिखर धवन, मुरली विजय व अजिंक्य रहाणे यांनी आपल्या कसोटी क्रमवारीत चांगलीच सुधारणा केली आहे.
आयसीसीने नुकतीच खेळाडूंची नवीन क्रमवारी जाहीर केली. बांगलादेशाबरोबरील एकमेव कसोटी सामन्यानंतर धवन, विजय व रहाणे यांनी आपल्या क्रमवारीत सुधारणा केली. विजयच्या क्रमवारीत ३ अंकांनी सुधारणा झाली असून, तो २०व्या स्थानी आहे. धवनने १५ अंकांनी झेप घेऊन ४५व्या स्थानी मजल मारली आहे. बांगलादेशाविरुद्धच्या सामन्यात शतकापासून वंचित राहिलेला रहाणे याने ४ अंकांची सुधारणा करून कारकिर्दीतील सर्वोच्च २२व्या स्थानावर झेप घेतली. कोहलीच्या क्रमवारीत एका अंकाने घसरण झाली असून, तो ११व्या स्थानी गेला आहे.
किंग्स्टन कसोटीत आॅस्ट्रोलियाने २७७ धावांनी विजय मिळविला होता. त्यात आपल्या दुहेरी शतकापासून वंचित राहिलेल्या स्मिथने श्रीलंकेचा कुमार संघकारा, दक्षिण आफ्रिकेचे एबी डिव्हिलियर्स व हाशिम आमला यांना मागे टाकून अव्वल स्थानी झेप घेतली. या कसोटीत स्मिथने १९९ व नाबाद ५४ धावा केल्या होत्या. या कामगिरीमुळे स्मिथ तेंडुलकरनंतर फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी गेलेला दुसरा युवा खेळाडू ठरला आहे. तेंडुलकर १९९९मध्ये अव्वल स्थानी होता, त्या वेळी त्याचे वय २५ वर्षे व २७९ दिवस होते. आत्ता स्मिथचे वय २६ वर्षे व १२ दिवस आहे. स्मिथ आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचणारा २३वा फलंदाज ठरला आहे. कर्णधार मायकल क्लार्क जानेवारी २०१३मध्ये अव्वल स्थानावर होता.
मात्र, असे असले तरी संघकाराला पाकिस्तानविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत अव्वल कामगिरी करून पहिल्या स्थानावर येण्याची चांगली संधी आहे.
स्टीव्ह वॉ सर्वाधिक ९४ कसोटी सामन्यांपर्यंत अव्वल स्थानी होते. तर, महान फलंदाज डॉन ब्रॅडमन ६,३२० दिवस अव्वल स्थानी होते. स्मिथला जमैकातील कामगिरीसाठी ४९ गुण मिळाले; त्यामुळे तो पहिल्यांदाच ९०० गुण तोडण्यात यशस्वी झाला. त्याचे आता ९१३ गुण झाले असून, तो सर्वाधिक कसोटी गुणांक मिळविणाऱ्या खेळाडूंच्या यादीत २४व्या स्थानी आहे. गोलंदाजीत भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्विन, बांगलादेशाचा साकीब अल हसन यांच्या क्रमवारीत एका अंकाची सुधारणा झाली आहे. दोघे अनुक्रमे १२व्या व १६व्या स्थानी आहेत.

Web Title: Dhawan, Vijay's performance improved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.